तुझ्या माझ्यात होती..एक अदृश्य दरी
एक अदृश्य दरी....
कशी आहेस ग? काय म्हणतेस... कोरडा प्रश्न मी विचारला तर खरी
पण माहीत होतं आटलेला झरा आता फिरून
येणार नाही माघारी
तु किंचित कसनुसून उत्तरली होतीस
.... मी? बरी....
माहीत होतं, आहे आपल्यात एक अदृश्य दरी
क्षणात आठवली आयुष्याची ती पानं
सारी
आपली ओळख झाल्या पासुनच्या आपल्या
मैत्रीच्या नाना परी
भासली होतीस तेव्हा तु एक अनोखी परी
आज फिकुटलेली वाटलीस तरी विचारलं
नाही कारण,कारण माहीत होतं पडली आहे आपल्यात
एक अदृश्य दरी
तुझं नाव, तुझा ठाव, वेगळीच होती तुझी दुनियादारी
तुझ्या बाबतीत जाणून घेतलं मी
सुद्धा परोपरी
एकदा आठवतंय येऊन ठाकले तुझ्या दारी
पण तो उंबरा खूपच उंच होता जाणिव
करुन देणारा...
की आहे आपल्यात एक अदृश्य दरी
तुझा संसार सजला,गेलीस तु भरल्या घरी
मैत्री आपली माझ्या मनात कायमच होती
अजुन तरी
तरीही जाणवत होतीच मला एक अदृश्य
दरी
मध्यंतरी कानावर आले होते कोणाकडून
तरी
राजाच्या राणी सारखी वावरतेस तु तुझ्या
घरी
कोण कुठली मैत्रीण आठवणार कशी तुला
तरी?
मला तुझ्या घरच्या पोकळ वाश्यांची
कुणकुण लागली होती जरी...
तरीही धजले नाहीच मी बोलायला
कारण...ती अदृश्य दरी
आज फारच वर्षानी भेटलीस बघ...
खोटीच दिसत होतीस का खरी?
मलुलले डोळे तेज दिसतच नव्हत
चेहर्या वरी
उसन अवसान आणून म्हणालीस कशी आहेस
ये न कधी माझ्या घरी
मी अगदी मनापासून बोलल्या सारखी
म्हणाले मी झकास आहे येईन कधी तरी
तुझ्या चेहऱ्यावर झाकोळून आलेला
अंधार दिसला होता मला
चिंता करू नकोस ग
आठवते आहे मला आपल्यातली अदृश्य
दरी!
मधु
No comments:
Post a Comment