Thursday, 10 September 2020

चाय

 

मी पहिल्यांदा चहा कधी प्यायले होते हे मला आठवणार नाही हे नक्की कारण आमच्या घराण्यात लहान बाळाचं उष्टावण चहा पाजवुन करायची पद्धत आहे!त्यामुळे आमचा एक प्रकारे बाप्तिस्मा झाल्याप्रमाणे चहा चाटवण्याची रित होती.आता ज्या बालकाने उष्टावणातच चहा प्यायला असेल त्याच्याकडुन तुम्ही काय अपेक्षा करणार!

तर अशा प्रकारे चहा ची सुरुवात तर झाली पण नंतर रोज मुकाट्याने मग भरुन दुध प्यायला लागायचं,चहा प्यायल्याने माणुस काळा होतो! असा एक समज भरवला गेला होता(ही अंधश्रद्धा आहे हे ज्यांनी मला बघितलं आहे त्यांना कळेल) त्यामुळे चहा नाहीच,पण महिन्यातुन एकदा होणार्या एरंडेल पिण्याच्या समारंभानंतर चहा प्यायला मिळे त्यांमुळे ते एरंडेल पिणं थोडं सुसह्य होई.

मात्र कोलेज मधे पाउल टाकल्यावर सर्वांप्रमाणे आम्हालाही पिसं आली होती त्यामुळे चहा वडा पाव हे रोजचं समिकरण बनलं होतं,नमोंच्या चाय पे चर्चा च्या आधी आम्ही चाय आणि वडा पाव पे चर्चा करायचो,त्या काळी दिवसाला एखाद्या दारुड्या सारखे आम्ही आठ आठ कप चहा प्यायचो.

प्रवासात तर चहा म्हणजे संजीवनीच,कुल्हड वाली चाय पिउन उरलेले कुल्ह्ड परत घरी घेउन यायचे,धरमशाला च्या ट्रेक ला ट्रेन ने जाताना ्मध्यरात्री एका स्टेशन वर जाग आली,तेव्हा चहा घेणार का ह्या प्रश्नाला मी कसलाही विचार न करता बिन्धास्त हो म्हणुन टाकलं.

पण ट्रेन मधेच मिळणारा डीप डीप वाला चहा मात्र कधीच आवडला नाही.चहा म्हणजे कसा वाफ़ेमधेच मसाल्याचा सुगंध येउन तरतरी आणणारा असला पाहिजे!

त्यानंतर कित्येक निरनिराळे चहा चाखायची आणि बनवायची वेळ आली.

कोरीगड ट्रेक मधे ३० जणांच्या ग्रुप साठी चहा बनवायची जवाबदारी माझ्यावर आली होती,तेव्हा इतक्या जणांसाठी चहा करताना प्रमाण असं कपाने घ्यायचं नसतं हे कळलं आणि त्यामुळे अंदाजे साखर चहा पावडर घालुन चहा केल्यावर आमच्या एका दादा कडुन सासरा साखर कारखाना वाला का ग तुझा! असा शेरा मिळाला होता! नशीब न! खरं नाही झालं त्याचं बोलणं!

तर कोलेज डेज च्या अखेर पर्यंत मी सर्टिफ़ाईड चहांबाज बनले होते!तेव्हा coffee फ़क्त दक्षिणेत प्रसिद्ध होती आणि cafe coffee day फ़ारच नवीन होतं त्यामुळे lot can hppen over a coffee अशी शक्यता जवळ जवळ नव्हतीच.......चहा कसा असा सर्वसामान्यांचं पेय आहे.

आता प्रवासांमधे बरेच वेगवेगळे चहा चाखायला मिळालेत...अगदी पन्हाळ्याच्या पायथ्याच्या धनगर वाडीत बकरीचं दुध घातलेला चहा किंवा वेल प्रोसेस्ड दार्जिंलिंग टी...लेह मधला बटर टी किंवा कश्मीर मधला काहवा.

नेपाळ मधे ट्रेक करताना प्यायलेला लेमन टी.माझ्या इंग्लंडच्या मित्राने खास माझ्यासाठी तिथुन आणलेला ब्लुबेरी आणि जस्मिन टी....केरळ मधे प्यायलेला वैनिला टी की मग गुजरात मधे प्रसिद्ध असलेला पुदिना नी चाय कुठे ते आठवत नाही पण खडी चम्मच चाय....त्यात इतकी साखर असते की त्यात चमचा खोचुन उभा करता येतो

ह्या प्रत्येक चहा चा कैफ़ वेगवेगळा पण एक गोष्ट मात्र लक्षात येते की ते वेगळ्या प्रकारचे चहा हे फ़क्त त्या ठिकाणीच छान लागतात....काहवा कश्मीर च्या बर्फ़िल्या ठंड मौसम मधे बेस्ट तर बटर टी एखाद्या मोनेस्ट्री मधे बसुन घेतला तर....लेमन टी ट्रेक मधे तरतरी आणण्यासाठी....

शेवटी प्रवासात तुम्हाला कितीही आरामशीर पलंगांवर झोपायला मिळालं तरी घरी आल्यावर त्या आपल्या नेहमीच्या सवयीच्या गादी उशीवर बेष्ट झोप लागते की नाही तसं मला आपला आलं आणि वेलची घातलेला चहा जवळचा वाटतो! अर्थात खुपच मुड असला की मी त्या उकळत्या पाण्यात आलं,वेलची,पुदिना,गवती चहा,दालचिनी,,मिरपुड,लवंग जमलच तर पारिजातकाची पानं असं घालुन साग्रसंगीत चहा बनवते....

आता मात्र वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी नामक चहा घ्यावा लागतोय,पण अर्थात मसाला चाय ची मजाच निराळी...

असो तर हे चहा पुराण आजच्या दिवशी करण्याचं कारण आज जागतीक चहा दिवस आहे!

चाय़ पियो मस्त जियो!

 

मधुवंती गोडसे

फोटोत दिसतो आहे तो लेमन टी बेस कॅम्प ट्रेक वर... अमा दाबलाम च्या बॅकग्राऊंड वर

 

 


 

ब्रह्मपुत्रा


नुकतंच ब्रह्मपुत्रा स्तवन नामक एक गाणं पाहण्यात आलं,त्यातली अप्रतिम फ़ोटोग्राफ़ी आणि गाण्याचा सुंदर अर्थ या मुळे नशाच चढली त्या गाण्याची.
गंगा नदी जशी पवित्र तशीच ही देखील खुप पवित्र मानली जाणारी नदी....
भारतीय संस्क्रुती मधे सर्वच नद्यांना पवित्र मानलं आहे
तर ही तिबेट मधे उगम पावणारी नदी...तिला तिबेट मधे सांगपो म्हणतात...भारतात तिला लोहित किंवा ब्रम्हपुत्र आणि बांग्लादेश मधे जमुना असं नाव आहे.....
एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नद्या सगळ्या स्त्रीलिंगी असतात...देवीचं रुप असतात ब्रह्म्पुत्र मात्र पुल्लींगी.... ब्रह्मा चा पुत्र!
तिबेटीयन समजुती प्रमाणे चांग तान पठार हे एका प्रचंड मोठ्या तलावाने व्यापलेले होते,
एका द्न्यानी माणसाने ठरवलं की मनुष्यजाती च्या आणी सर्व जीवांच्या कल्याणासाठी पाणी प्रवाहीत झालं पाहिजे आणि म्हणुन त्याने हिमालयातुन पाणी वाहतं करण्यासाठी त्याला मार्ग करुन दिला...हा ओघ ज्या मार्गावरुन वाहत गेला तो अर्थातच सुजलाम सुफ़लाम झाला आहे.....
अजुन एक खुप मनोरंजक गोष्ट वाचायला मिळाली ती म्हणजे ह्या नदीला ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्मा चा पुत्र असं म्हटलं जातं आणि त्याच नावाचा ब्रह्मकुंड देखील आहे. परशुरामांनी जेव्हा आपल्या आई चा वध करुन जे घोर पातक केलं त्यामुळे त्यानी वापरलेलं हत्यार त्यांच्या हातातच चिकटुन बसली...संतांच्या सांगण्यानुसार ह्या पातकाचं प्रायश्चित्त करण्यासाठी त्याला तीर्थयात्रा करावी लागणार होती,ब्रह्मपुत्रा नदीजवळ परशुरामांनी आपल्या कुर्हाडीने पर्वतांची एक रांग दुर करुन स्थानिकांसाठी पाणी उपलब्ध करुन दिलं,त्या मधे कुर्हाडीला पाण्याचा स्पर्श होउन त्यावरील रक्त पाण्यात मिसळलं आणि त्यामुळे पाण्याला एक लाल छटा प्राप्त झाली!
अशा अजुनही काही दंतकथा या नदीशी जोडल्या गेल्या आहेत.
ब्रह्मपुत्रा या भागाच्या शेती सिंचनासाठी आणि जलवाहतुकीसाठी एक महत्वाची नदी आहे.....महाकाय पात्र असलेली ही नदी नव्हे महानद आहे,
या नदीचा प्रवेश अरुणाचल प्रदेशातुन भारतात होतो जगाचे छप्पर म्हटल्या जाणार्या तिबेट कडुन ही नदी वाहत येउन सखल मैदानी प्रदेशात वाहते अरुणाचल प्रदेशा मागोमाग आसाम च्या धरतीत दाखल होते.
दिब्रुगड आणि लखीमपुर यां मधे ही नदी दोन भागांत विभागली जाते हे दोन वेगवेगळे झालेले प्रवाह परत एकत्र होता आणि मधलं तयार झालेलं बेट माजुली म्हणुन ओळखलं जातं हे जगातलं सर्वात मोट्ठं नदीतलं बेट आहे. माजुली वर सध्या पाउस आणि पुरांमुळे नष्ट होण्याचं संकट आहे.ह्याचं क्षेत्रफ़ळ हळुहळु कमी होत चाललय...
त्यानंतर ती बांग्लादेश मधे प्रवेश करते....नकाशात बघितलं तर ह्या गाण्यात म्हटल्यासारखं...तु देश के कंधे का है नीला दु:शाला! एखादी नीळी शाल घेतल्यासारखी ही नदी वाहताना दिसते..
ब्रह्मपुत्रा नदीला पावसाळ्याच्या काळात कायमच पुर येत असतात,नदीच्या पात्रात झाडतोड केल्यामुळे नदीपात्राचे झीजणे,
पुरजन्य परीस्थीती आणि त्यामुळे जीवीत आणि वित्त हानी ठरलेलीच....
आसाम अरुणाचल मधील जनतेच्या आयुष्याचा,संस्क्रुतीचा अविभाज्य भाग....
अशी ही महाबाहु ब्रह्मपुत्र
मधुवंती







 https://www.youtube.com/watch?v=NdPgNulVDEo&fbclid=IwAR37EBW8MUd2oPF24v1KoDjeeJZx33DQBxzboV_nd70hmm6-VOADVQKo3Qw

उत्तुंग

 

जामनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लाखोटा लेक पाशी सगळी संध्याकाळ घालवली होती आणि आता परत जायचं म्हणुन वळणार तितक्यात आकाशात काही काळसर दिसलं,वर बघितल्यावर दिसलं रुस्टिंग.... स्टार्लिंग ह्या छोट्या पक्ष्याचं रुस्टिंग....

रुस्टिंग म्हणजे संध्याकाळच्या वेळी एखाद्या झाडावर आश्रय घेणं....त्या वेळी  एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करतात हे पक्षी...हे छोट्या आकाराचे पक्षी एका वेळी समुहात आणि विविध आकार करुन निरनिराळ्या आकारात आकाशात चकरा मारतात...हळुहळु त्यांची संख्या सुद्धा वाढत गेलेली दिसते आणि असं वाटतं जणु कोणी महाकाय पक्षी आकाशात आहे.....हा नजारा बघणं केवळ अप्रतिम अनुभव असतो.....

हे करण्याच कारण काय? जे शक्ती प्रदर्शन करताना माणसाचं असतं तेच! आपण किती मोठे आहोत म्हणजेच आमच्यावर हल्ला करु नका असा मोठ्या शिकारी पक्षांना दिलेला इशाराच म्हणा ना!

त्यावरुन आठवलं.....मध्यंतरी एक व्हिडिओ फ़िरत होता,कोणत्यातरी देवस्थानाभोवती हे पक्षी त्या देवाच्या आरतीच्या वेळी तालात अशा हालचाली करतानाचा....तर त्यांच्या श्रद्धेचा मान ठेवुन असं नम्रपणे नमुद करावसं वाटतं की ते तसं काही नाही त्यांच्या त्या घिरट्या मारण्याला कुठल्याही संगीताची जोड दिली तरी आपल्याला ते त्या तालावर नाचत आहेत असं वाटेल....प्रत्यक्षात हे मिथ्या आहे.

 

Gods must be crazy नावाचा एक धमाल पिक्चर बघितला होता,दुसरा भाग ज्यात वेगवेग्ळ्या गोष्टी एकाच वेळी अफ़्रिकेच्या कलहारी वाळवंटात  घडत आहेत...आणि शेवटी नियती त्यांना एकत्र आणते आणि त्या दरम्यान आणि त्यानंतर ची धमाल म्हणजे हा चित्रपट.

त्या प्र्संग मालिके मधे एका आफ़्रिकन आदिवासी माणसाची दोन छोटी मुलं हरवली आहेत,ही मुलं पहिल्यांदाच बघितल्या ट्रक मधे कुतुहलाने चढतात आणि मग ट्रक सुरु होउन त्या बरोबर त्यांची सफ़र सुद्धा सुरु होते!

ट्रक मधुन बाहेर पडल्यावर वन्य प्राण्यांच्या प्रदेशात ही पोरं येतात आणि एक तरस त्या दोघांवर चालुन  येतं,ते तसं येताना बघितल्यावर ती पोरं कुठुन तरी लाकडाची फ़ळकुटं मिळवतात, आणि ती डोक्यावर उभी धरतात....ते बघुन ते तरस घाबरुन पळुन जातं....कारण स्वत: पेक्षा आकाराने काहीतरी मोठा प्राणी आहे असं त्याला  वाटलं...

बिबट्याच्या हल्ल्यांमधे सुद्धा समजा तुम्ही तुमचे दोन हात वर करुन स्वत: ला त्याच्यापेक्षा मोठ्ं दाखवण्याचा दिखावा केलात की बिबटे घाबरुन पळुन जातात.

निसर्गात अशा अन्य देखील गोष्टी दिसतात ज्या स्वत:च्या संरक्षणासाठी वेगळं रुप घेतात किंवा आपण द्रुष्टीला पडु नये म्हणून आजुबाजुच्या वातावरणात मिसळुन जातात.

पफ़र फ़िश नावाचा मासा जो संकट जाणवलं की स्वत:ला फ़ुगवतो...

 

माणुस मात्र जसजसा प्रगल्भ होत गेला तसा स्वसंरक्षणाबरोबरच स्वस्तुती आणि स्वप्रतिमा निर्मिती बद्दल जास्त जागरुक झालेला दिसतो,आजकाल जरा जास्तच....

 

मी किती मोठी/मोठा महान इतका द्न्यानी इतका विद्वान हे दाखवण्यासाठी काही लोक स्वत:ला फ़ुगवतात,डोक्यावर फ़ळकुट घेउन उंच झाल्याचा देखावा करतात.सर्व शक्तीमान असल्याचं नाटक करतात, पण खरी गोष्ट अशी की एकटे पडतात तेव्हा त्यांनाच कळत असावं आपण किती पोकळ आहोत....

 

ध्रुव भट हे गुजराती लेखक एका मुलाखती मधे एक गोष्ट सांगताना म्हणतात,कुत्र्यांचा कळप एका नव्या कुत्र्याला बघुन म्हणतात, "आमच्या इलाक्यात येउ नकोस!" नवा कुत्रा विचारतो, "इलाका म्हणजे काय?" तेव्हा कळपाचा नेता तो कुत्रा म्हणतो, "तु इथे ये म्हणजे सांगतो इलाका म्हणजे काय ते!" नवीन कुत्रा म्हणतो मला समजलं तुझा इलाका म्हणजे काय! तो तुझा इलाका नसेल तर तु काहिच नाहीस.....तसं काहिसं ह्या व्यक्तींच होत असावं नाही?

ज्या व्यक्ती खरोखरच महान आणि त्या उंचीच्या असतात, त्यांना कधी स्वत:च्या बद्दल बोलण्याची गरज पडत नाही.

समुद्र किंवा पर्वत कधी स्वत:चा दिखावा करायला जात नाहित त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठी अशा दिखाव्यांची गरज नसते पर्वतांनी थोडी हालचाल केली तर  काय अनर्थ होतो किंवा समुद्र उधाणला की काय होतं हे वेगळं सांगायची काय गरज?

तस्मात.... उत्तुंग व्हायचंच असेल तर हिमालयासारखं शांत आणि संयमीत असणं, विशाल व्हायचं असेल तर,समुद्रासारखं अथांग खोल आणि अफ़ाट व्हायचं असेल तर आकाशाप्रमाणे निरंतर आणि अदभुत असणं आवश्यक असतं.

 

मधुवंती  गोडसे

 





बालमित्र

 

ती आणि तो आज किती वर्षांनी भेटत होते.... अधल्या मधल्या भेटी फारच तुटपुंज्या अर्ध्या मुर्ध्या आणि थोड्याशा अबोलच... पण गत स्मृतींचा गंध मात्र त्या भेटी ना होताच....
ती ते गाव सोडून गेली तेव्हा होती उणी पुरी ७ वर्षाची आणि तो तीच्याहूनही एक वर्षाने लहान...त्या ठिकाणी आल्यापासून चां तिचा पहिला मित्र त्याच्या घरात किंवा तिच्या,दोघांचा मुक्त वावर असायचा... घरामागे लागलेले आवळे तोडणे असो की मग घरासमोरच्या गार्डन मध्ये झोके खेळणं असो दोघांनी ते बरोबरच करायचं असा एक अलिखित नियमच होता... एकदा सोसायटीच्या गेट टुगेदर मध्ये म्हणून तिच्या आजीनी तिला सजवून तयार केलं होतं आणि गाणं शिकवलं होतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर मात्र तिने ते गाणं म्हणणं साफ नाकारलं आणि त्याच्या बरोबर नेहमी करत असलेला नाच मात्र दोघांनी मिळून झक्कास केला.
ती ला परत तिच्या गावी जावं लागलं आणि साश्रू नयनांनी दोघांनी एकमेकांना निरोप दिला. पोरं आहेत छोटी सावरतील लवकरच असं वाटणाऱ्या मोठ्यांना मात्र आश्चर्य वाटलं ते ह्यांची मैत्री किती दृढ होती ह्याचं....
ती परत गेल्यावर त्याने त्याच्या वाढदिवसाचा केक तिच्यासाठी खास पाठवला... अजूनही त्या केक चां वास तिच्या मनात दरवळतो आणि तो अजुनही बालपणीच्या जादुई दिवसांना विसरलेला नाही. अधुन मधुन भेटतात तेव्हा परत एकदा तेच आयुष्य जगण्याचा प्रयत्न ते करतात... आयुष्य बदललेल असलं तरी त्या क्षणापुरते ते दोघं तसेच असतात छोटूकले एकमेकांचे जीवाभावाचे मित्र!

मधुवंती




 

 माझी आवडती पुस्तकं

 

बाळपणीचा काळ सुखाचा ! असं म्हणतात तेच खरं नाही का? कसली चिंता नाही ताण नाही , आईच्या कडेवर बसून जग फिरायचं आणि शब्दज्ञान  नसतानाही बोलीभाषा कानावर पडत आपण शिकत जातो,  इथपासूनच खरंतर आपली वाचनाची सुरवात होते. हळू हळू श्री गणेशा गिरवत अक्षरं आणि शब्द येतात जोडीला आणि मग बालभारतीपासून गाठ पडते ती पुस्तकाची...या पाठ्य पुस्तकासोबत आई आज्जीने सांगितलेल्या गोष्टींची पुस्तकं हाती लागतात , भेट म्हणून मिळतात ...वाचनाची गोडी वाढायला लागते...अस्सचं होतं की नाही हो आपलं सगळ्यांचंच! कालमानाप्रमाणे भावना शब्द पुस्तकं बदलतील कदाचित पण ही ओळख ही ओढ अशीच रहाणार यात शंकाच नको...लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे वाचनानुभवाचे गोड कण साठवत आपण मोठे होतो.

चंपक,चांदोबा वाचण्याचे दिवस संपले होते आणि खरंतर दिसेल ते पुस्तक पानं खाणा-या  किड्यासारखे वाचुन काढायचं असं सुरु झालं होतं....

त्यात मग उत्कृष्ट  निकृष्ट सगळंच साहित्य हाती पडलं पण काही पुस्तकं अशी होती जी त्या अडनिड्या वयात वाचन सुखकर करुन बरंच काही समजावुन गेली...

दुर्गा भागवत यांनी स्वत:च्याच लहानपणीच्या आठवणींवर लिहिलेलं ’लहानी’ हातात आलं,छोटंसं पुस्तक त्यामुळे वाचुनही लगेच एका दिवसात झालं,आणि ते मनात पक्कं बसलं.एका छोट्या मुलीच्या भवतालचं जग तिला किती अद्भुत आणि मनोरंजक वाटु शकतं आणि छोट्या छोट्या गोष्टीत लहान मुलं कसा आनंद शोधतात. छोट्या दुर्गीच्या बरोबर लोणावळ्याच्या जंगलात मीही भटकले,तुळशीच्या बिया गोळा करुन त्याची खीर बनवणं,गारगोट्या गोळा करुन ते हिरे जवाहरात म्हणुन वापरणे ह्या गोष्टीचा इतका परिणाम झाला की मी सुद्धा

डोंगरांमधे भटकताना चमकणारे स्फ़टिक,गारगोट्या गोळा केल्या आणि ख-या हि-यांसारख्या जपल्या.

त्यातली घारीच्या डुखाची कहाणी ऐकुन मी सुद्धा पक्षांना कधी त्रास देण्याचा विचारही केला नाही, जशा तुळशीच्या बिया जमवता जमवता लहानग्या दुर्गीच्या समृध्द लेखिका दुर्गाबाई झाल्या तशी मी गारगोट्या जमवता जमवता हिरा व्हायचा प्रयत्न करत गेले.

आपल्या बोली भाषेतल्या  पु.ल.देशपांडे, व.पु.काळे आदी प्रथितयश लेखकांची  पुस्तकं तर वाचलीच पण अजून वेगळं काही मिळतंय या शोधक वृत्तीमुळे  अनुवादित भाषांतरीत पुस्तकांची नवी वाट सापडली आणि नवनवीन संस्कृतींची तोंड ओळख झाली व विशेष रुची निर्माण झाली..यांतुन नवीन प्रदेश,त्यांची संस्कृती यांची नवीन ओळख होत गेली,

 

तेत्सुको कुरोयानागी या जपान च्या टेलिव्हीजन आर्टिस्ट ने लिहिलेलं आणि चेतना सरदेशमुख-गोसावी यांनी अनुवादित केलेलं ’तोतोचान’ वाचणं हा एक विलक्षण आनंददायक अनुभव होता.

विश्वयुद्धातला काळ दर्शवला गेला आहे,लहान मुलांचं भावविश्व त्यांना पडणारे निरागस प्रश्न आणि त्यांना त्याच प्रकारे समजुन घेण्यासाठीची एक दृष्टी जी खुप कमी जणांकडे असते....तोतोचान हे पुस्तक मुलांशी कसं वागावं आणि त्यातुन त्यांचं भावविश्व जपत त्यांचा विकास कसा घडतो याचं सुंदर उदाहरण आहे हे पुस्तक.

Child pschycology  वर खुप जड जड शब्द वापरुन लिहिलेली बरीचशी  पुस्तकं सापडतील पण इतक्या सोप्या शब्दात आणि घडलेल्या अनुभवातुन ते शिकवणं जास्त अवघड..

’तोतोचान’ जपानी भाषेत छोटी मुलगी जिला तिच्या आधीच्या शाळेतुन काढुन टाकलं आहे,एक चाकोरीबद्ध विद्यार्थिनी नसल्यामुळे....त्यानंतर ती तोमोई ह्या श्री कोबायाशी यांनी चालवलेल्या एका आगगाडीचे वर्ग असलेल्या शाळेत...तिथुन तिचं जीवन,ती चं अनुभवविश्व बदलुन निघतं...मुल्यशिक्षण हा विषय न शिकवता सुद्धा ह्या मुलांच्या मधे ही मूल्यं आपोआप रुजत जातात,ह्या पुस्तकाचं वैशिष्ठ्य असं की आपण स्वत: ला तोतोचान च्या जागी बसवुन पुस्तक वाचु लागतो.

जपान अमेरिका हिरोशिमा नागासाकी युद्धाची पार्श्वभुमी याला आहे,कोवळ्या मुलांवर युद्ध आणि त्यविषयीच्या संबंधीत विचार कसा परिणाम करु शकतात आणि त्यात त्यांचं भावविश्व जपत बाह्य जगाशी अलिप्त राहुन तोतोचान आणि तिचे सहाध्यायी त्यांचं एक जग कसं निर्माण करतात,त्यात मग जात पात,रंगभेद ह्या कसल्याच गोष्टीला स्थान नसतं.

कोणतंही मुल वाईट नसतं पण आजुबाजुचं वातावरण,आणि त्याच्या बरोबरच्या मोठ्या लोकांचा त्याच्यावर पडणारा प्रभाव याने ते घडत किंवा बिघडत जातं...ह्या कोवळ्या कळ्यांना त्याच वेळी जपण्यात आलं तर मात्र त्यांच्या आयुष्याला एक वेगळा आयाम मिळु शकतो,

एक प्रोत्साहन पर शब्द त्या मुलाच्या आयुष्यात काय बदल घडवु शकते आणि त्याविरुद्ध एक नकारात्मक वाक्य त्या मुलाला नैराश्याच्या गर्तेत झोकु शकतं हे फ़क्त पुस्तकी ज्ञानात नाही तर प्रत्यक्ष कृतीतून

 अनुभवता येतं,

तोमोई शाळेतली प्रत्येक घटना आपल्याला नकळत काही शिकवुन जाते,मग ती एकत्र बसुन डोंगरावरचं थोडं आणि समुद्रातलं थोडं खाणं असु दे की मग तोमोई चा अनोखा क्रिडा दिन असो की कुहोनबुत्सु मन्दिराची सहल असो...

 

तोमोई शाळेचे संस्थापक श्री.कोबायाशी यांनी ही शाळा सुरु केली सन १९३७ मधे आणि हवाई हल्ल्यांमधे ती जळुन गेली १९४५ मधे ,म्हणजे फ़क्त ८ वर्षांचं आयुष्य लाभलेली ही शाळा पण त्या शाळेमुळे तेत्सुको सारख्या अनेक मुला मुलींच्या आयुष्यांना एक वेगळं वळण दिलं.

तेत्सुको ने लेख मालिका म्हणुन सुरु केलेलं हे लिखाण इतकं गाजलं की लवकरच त्याचं पुस्तकात रुपांतर करण्याची मागणी आली,सन १९८० मधे प्रकशित झालेलं हे पुस्तक अनेक भाषांमधे अनुवादित झालं.ह्या वर चित्रपट बनवण्याची मागणी झाली पण तेत्सुकों नी ती नाकारली.

तोतोचान चा काही भाग जपानी शाळांमधे पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता.

तोतोचान हे बेस्ट्सेलर ठरलं आहे.तेत्सुको ह्यांना युनिसेफ़ च्या सद्भावना दूत म्हणुनही नेमण्यात आलं.

तोतोचान हे अगदी लहान मुलांपासुन ते वयोव्रुद्ध व्यक्तींपर्यंत वाचायला चांगलं पुस्तक आहे, Child pschycology अर्थात मुलांच्या मनाचा भावनिक अगदी सांगोपांग आढावा घेता घेता  स्वत:च्या मनाची जडणघडण तर झालीच पण पुढील आयुष्यात आपल्या मुलांची काळजी घ्यायची तयारीही आपसुकच झाली... अर्थात आता मन आणि आयुष्य तारूण्य सुलभ भावनांमधे रमायलाही लागलं होतंच याला जोड मिळाली ""ची..............

 

लुइसा मे अल्कोट या अमेरिकन लेखिकेने लिहिलेलं लिटिल विमेन आणि शांता शेळकेंनी अनुवाद केलेलं चौघीजणी हे सुद्धा एक असं पुस्तक आहे जे चार बहिणी त्यांचं कुटुंब आणि त्यांचा मित्र लॉरी यांच्या लहानपणापासुन ते तारुण्यापर्यंतच्या जगात सैर घडवुन आणते.

या पुस्तकाला देखील अमेरिकन सिव्हील वाॅर चा (american civil War) संदर्भ आहे,तो ह्या मार्च कुटुंबातल्या चार बहिणींवर आणि त्यांच्या भवतालावर कसा परिणाम घडवतो हे ह्या पुस्तकात अगदी बारकाईने वाचायला मिळतं.

सन १८६८ साली प्रथम आवृत्ती निघालेले हे पुस्तक स्वत: लुईसा ह्यांच्या आयुष्यावर बर्याच अंशी बेतलेलं पुस्तक म्हणावं लागेल.एक शतक मागे १८ व्या शतकात नेणारं हे पुस्तक तेव्हाचं अमेरिका,तिथल्या लोकांची विचारसरणी त्यांचे पेहराव आदींची ओळख आपल्याला घडवते.

या पुस्तकात आपल्याला ओळख घडते ती चार बहिणींची आणि त्यांची आई मिसेस मार्च

मेग,ज्यो,अँमी आणि बेथ ह्या त्या बहिणी ज्यांची व्यक्तीमत्वं वेगवेगळी आहेत,

त्यांच्या जगण्यामधे त्यांची तत्वं,त्यांचा जगाविषयीचा द्रुष्टीकोन विविध अंगांनी केलेला विचार,आर्थिक तंगी मुळे सामोरी आलेली आव्हाने आणि त्यावर केलेली मात.....शिवाय शेजारचा हुशार पण एकाकी मुलगा लॉरी त्यांच्यातलं निर्व्याज मैत्र...

बालपणातील खेळ,नाटकं पिकनिक्स यापासुन सुरु झालेलं हे पुस्तक हळुवार पणे आपल्याला या चौघीजणींच्या तारुण्यात अलगद घेउन जातं.तारुण्यातल्या प्रेमसुलभ भावना मेग मार्च म्हणजे सर्वात मोठी बहिणीचं जोन ब्रुक वर प्रेम जडणं तसं बघितलं तर त्या एकत्र बांधलेल्या कुटुंबात आगंतुकाचा सुखद प्रवेश असतो,

दरम्यान काही संकटांनाही ह्या बहिणींना सामोरं जावं लागतं.

त्याच दरम्यान बाहेरच्या दिखाउ आणि भुरळ घालणार्या जगाशी त्यांची ओळख होते...जी त्यांच्या वरच्या संस्कारांना काही अंशी तडा पोचवणारी पण आवश्यक सुद्धा असते,इथुन त्यांच्या प्रत्येकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते.

मेग चा ब्रुक बरोबरचा नवा संसार,लॉरी (laury) च्या मनात उमलणार्या प्रेमभावना ज्यो साठी आपल्या सौन्दर्याच्या गर्वात चुर असलेली अँमी (Amy) स्वत:ची तब्ब्येत ठीक नसतानाही परोपकाराची भावना असणारी बेथ आणि त्यांची नवनवीन कौशल्य छंद काही घटना आपल्याला त्यांच्या आयुष्याशी गुंतवुन ठेवतात.

ह्यात त्यांनी केलेले प्रवास विशेषत: युरोप चे आकर्षण आणि प्रवास वर्णन हे देखील तरुण मुला मुलींना आकर्षित करणारेच आहे.

हे मुळ पुस्तक दोन भागांमधे प्रसिद्ध झालं ज्यात पहिल्या भागात त्यांच्या लहानपणाबद्दल आणि दुसर्या भागात त्यांच्या तारुण्याबद्दल लिहिण्यात आलं आहे पण ह्याच्या मराठीत अनुवादित पुस्तकात दोन्ही भाग एकत्र करुन चौघीजणी या नावानेच हे पुर्ण पुस्तक उपलब्ध आहे.

ह्या पुस्तकात ज्यो हे एक मुख्य पात्र जाणवते मुलत: लेखिकेने स्वत:वरच हे पात्र बेतलेलं आहे,प्रत्येकच मुलगी ह्या कथेतल्या कुठल्या न कुठल्या तरी पात्रात स्वत:ला पाहतो....

ह्या मुळ पुस्तकावर नंतर चित्रपट निघाले,संगितिका निघाल्या.

चौघीजणी ही फ़क्त त्या चौघींची गोष्ट नाही त्याबरोबरच बदलत्या जीवनमानाची,मुल्यांची,संस्कारांची तथा  बदललेल्या जगाची गोष्ट आहे.

युध्दस्य कथा रम्या म्हणतात पण  विश्व युध्दाच्या पार्श्वभूमीवर घडत असलेली ही वेगळी कथा ज्यात प्रेमकथा गुंफत गेलेली अनुभवताना कळत नकळत जीवनावश्यक चार गोष्टी गाठीशी लाभल्या हे त्या दोन्ही लेखिकांचं,  लुईसा मे अल्कोट व शांताबाई शेळके यांचं यश आहे  हे नक्की. हे पुस्तक वाचताना  जीवन हेही एक युध्दच की असं वाटलं तर नवंल नाही.

युध्दात आणि आयुष्यात महत्वाचं काय तर टाईम मॅनेजमेंट आणि क्वालिटी मॅनेजमेंट याच विषयावरचं एक पुस्तक विशेष भावलं,

 

मंगला निगुडकर यांनी अनुवादित केलेलं चीपर बाय दी डझन हे फ्रँक गिलब्रेथ ज्युनियर ने लिहिलेलं हे पुस्तक  म्हणजे एक मजेशीर अनुभव पण त्याच बरोबर आज कालच्या परवलीच्या संद्न्या  क्वालिटी मैनेजमेंट आणि टाईम मैनेजमेंट हसत खेळत शिकवणारं हे पुस्तक.

फ्रँक गिलब्रेथ या व्यवसायाने इन्जीनियर असलेल्या आणि संशोधक व्रुत्ती असलेल्या माणसाने त्याच्या कुटुंबाला हाताशी धरुन त्याची १२ मुलं आणि बायको अशा मोठ्या कुटुंबाला घेउन कित्येक प्रयोग केले कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसं आणि निपुणतेने करावं ह्याचे पाठ ह्या पुस्तकात मिळतात,फ्रँक नी आपल्या मुलांना टायपिंग,मोर्स कोड वाचणे बनवणे जर्मन,फ़्रेन्च आदी भाषा तसेच भुगोल,खगोलशास्त्र आदी विषयात पारंगत केलं होतं.

लहान पणापासुनच त्यांच्यावरच्या जवाबदार्यांची जाणिव व्हावी म्हणुन प्रत्येकाला काही कामं नेमुन दिली आणि ती कटाक्षाने कशी होतील या कडे त्यांचे लक्ष असे,त्याशिवाय उर्जेची बचत,काटकसर यासाठी त्यांनी आपल्या मुलांना त्याप्रमाणे शिकवुन तयार केलं होतं अर्थात हे सगळं जरी असलं तरी हे पुस्तक रुक्ष अजिबात नाही उलट हे प्रयोग करताना त्यात काय काय गमती जमती घडतात आणि त्यातुन उद्भवणारे छोटे गमतीशीर प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात.फ्रँक  बर्याच कारखान्यांमधे कार्यकुशलता वाढवण्यासाठी सल्लागार म्हणुन जात असत...त्याविषयी बरेच प्रयोग त्यांनी आपल्या मुलांवर केलेले असत.आपत्कालिन व्यवस्थापन कसं असावं याचं देखील द्न्यान हे पुस्तक हसता हसवता देते.

कदाचित व्यवस्थापन शास्त्रावरचं एकमेव विनोदी पुस्तक हेच असावं.

तर मंडळी कशी वाटली ही मला आवडलेल्या पुस्तकांची छोटेखानी सफर...यातच इतका आनंद मिळाला नं..मग वेळ काढून वाचा नक्की..  ...कारण कोणीतरी म्हटलंच आहे नं वाचाल तर वाचाल ... आपल्या बोली भाषेतली तर वाचालच पण...इतर भाषांतरीत-अनुवादीत पुस्तकं पण वाचा कारण..... अनुवादित पुस्तकं वाचल्याने दुसर्या देशाची संस्क्रुती,राहणी,खानपान आणि विचार शैली हे आपल्याला कळु शकतं,अशी अजुनही अनेक अनुवादित पुस्तकं उपलब्ध आहेत,

काही पुस्तकांची पण यादी देऊन ठेवते...

 

एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर

अकुपार- ध्रुव भट (मुळ गुजराती पुस्तक)

आत्मरंगी - मुळ पुस्तक  रस्किन बॉण्ड ( Lone fox Dancing)

दा विन्ची कोड - डैन ब्राउन

 

 दिवाळीचा आनंद लुटा आणि वाचनाचाही... या अक्षर शुभेच्छांसह दिवाळीच्या शुभेच्छा देते.... !!!

 

मधुवंती गोडसे

 पुर्व प्रसिद्धी-स्पर्शद्न्यान दिवाळी अंक २०१९

World photography day



ट्रेकिंग ला 95 पासून सुरुवात केली तेव्हा एक बॉक्स कॅमेरा मिळाला होता .त्यात फिल्म घालून 32 फिल्म्स चा तो रोल जपून वापरणं आणि एका हिमालयाच्या ट्रेक मध्ये जेमतेम 2 रोल्स वापरायचे कारण ते महाग होते.
सह्याद्री च्या ट्रेक्स साठी तर कॅमेरा घेऊन जातच नव्हते.
2006 मध्ये परत सौरकुंडी पास ट्रेक ला गेले तेव्हा आमच्या ग्रुप मधल्या ललित कडे सोनी चा फिक्स लेन्स कॅमेरा बघितला आणि नवीन डीएस एल आर घेण्याचं स्वप्न डोक्यात घोळू लागलं.
त्यासाठी सेविंग सुरु केलं,माझा कॅमेरा घेण्याचा हट्ट बऱ्याच जणांना अनाठायी वाटला होता. कशाला हवाय फार उपयोग होणार नाही असे अनेक सल्ले मला मिळाले पण मी माझ्या निर्णयावर कायम होते.
2008 मध्ये शेवटी बर्याच प्रयत्नानंतर 15 दिवसांची सुट्टी मिळाली (तेव्हा मी बँकेत नोकरी करायचे आणि तिथे सुट्यांची वानवाच होती.)
फॅमिली vacation चा प्लॅन ठरला destination Kerala आणि त्या ट्रिप च्या आधी कॅमेरा हातात आला पाहिजे असा विचार पक्का झाला. म्युच्युअल फंड मधले एसआयपी हा ऑप्शन मस्त कामी आला आणि बघता बघता कॅमेरा घेता येण्या एवढी रक्कम खात्यात जमा झाली. जेव्हा माझा पहिला DSLR Nikon D60 हातात आला तेव्हा मात्र त्याला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. मी 'त्या'च्या बद्दल भयंकर पझेसिव्ह होते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही त्याला हात लावायचा नाही असा माझा आग्रह होता.एकहाती वस्तू अधिक चांगली टिकते हा त्या मागचा हेतू!
केरळ ट्रिप खूप सुंदर झाली आणि त्या सगळ्या सुंदर मोमेंट्स माझ्या ह्या कॅमेऱ्या मुळे कायमस्वरूपी बंदिस्त झाले आहेत.
असा हा माझा D60 ज्याने मला माझ्या प्रत्येक ट्रिप आणि ट्रेक मध्ये साथ केली.आणि 'ज्याच्या' मुळे माझ्या फोटोग्राफी ला सुरुवात झाली......
कधीही न थांबण्यासाठी!
मधुवंती
बरोबरचा फोटो केरळ ट्रिप मध्ये काढलेला. 😊

Written on World Photography Day