Saturday, 5 December 2015

बाजीराव मस्तानी ?????

बाजीराव मस्तानी चा वाद गेले बरेच दिवस चालु आहे,त्यातील अजुन एका गाण्यावर बंदी घालण्याची मागणी झाल्याचे आज वाचलं,म्हणुन मग मुद्दामच ते गाणं युट्युब वर लावलं मल्हारी नावाचं ते गाणं फ़डकत्या चालीचं.....रणवीर सिंग नावाचा एक फ़ालतु अभिनेता बाजीरावाच्या वेशात येउन एकदम एखाद्या टपोरी गुंडासारखं गाणंच म्हणायला लागला आणि त्याचे बोल ऐकुन तर हसावं की रडावं कळेना!!
बजने दे धडक धडक,चटक मटक आणि दुश्मन की वाट लावली???!!!!
संजय लीला भंसाळी चं बाजीराव पेशवा आणि बाजीराव सिंघम यात काही confusion तर झालं नाहीये ना? हे अशा प्रकारचं गाणं टाकुन त्याने एकुणच बाजीराव ची अशी वाट का लावली आहे कळेना!!
मग त्याची trade secrets लक्षात येउ लागली,मुळात आता हे गाणं चित्रपटाच्या संदर्भात न घेता ते लवकरच येणार्या होळी किंवा गणेशोत्सवासाठी बनवले असावे लोकांना दारुकाम करुन नाचायला अजुन एक गाणं मिळालं नाही का? आज बाजीरावांनाही कदाचित हळहळ वाटत असावी की अरे लढाई जिंकल्यावर अशा प्रकारे नाचायला शिकवायला आपल्या वेळेस कोणी कोरियोग्राफ़र्स का नवते? आपले भाषा द्न्यान इतके अपुरे कसे की आपल्याला वाट लावली! सटकली असे शब्द माहीत नवते!!
हा चित्रपट बघायला जाणारे इतिहास प्रेमी? हे बाजीराव,मस्तानी आणि काशीबाई यांना शोधायला जाणारच कुठे आहेत? ते जाणारेत दीपीका प्रियांका आणि रणवीर ला पहायला,त्यांना पुर्वेतिहासाशी काय घेणं देणं?त्यांना दोन चार तडकती फ़डकती गाणी आणि थोडी फ़ायटिंग बघायला मिळाली,एखादी दुपार किंवा संध्याकाळ थियेटर मधे घालवली की झालं.....त्यांना पुर्व संस्क्रुतीशी काय हो करायचय? त्यावेळच्या दागिन्यांसारखी डिझाईन्स घालुन पार्ट्यांमधे मिरवता आलं की झालं,पिंगा या गाण्यामधे प्रियांका आणि दीपीका कशा नाचल्यात,त्यांनी मिळुन पिंगा घातला की कव्वाली की फ़ुगडी याच्याशी त्यांना काय करायचय? स्कुल फ़ंक्शन्स मधे तसच नाचुन नंबर मिळवता आला की बास!! धन्य तो रणवीर,ती प्रियांका आणि दीपिका आणि धन्य धन्य तो संजय लीला भन्साळी!!


मधुवंती गोडसे

Sunday, 30 August 2015

नोमिनी




काय subject line पाहून गोंधळलात न? साधारणपणे hi hallo ने सुरु होणारा मेल असा एकदम कायदेशीर पद्धतीने का आला? आज मी माझ्या बँकेत घडलेला एक किस्सा सांगणार आहे...
कदाचित हास्यास्पद वाटेल पण खोल विचार केला तर खुप गंभीर बाब आहे.
परवा नेहमीप्रमाणे दिवस चालू झाला होता साधारण दुपारी १२ वाजता एक काम उरकून आतून बाहर येत असतानाच एक नेहमीच्या अकाउंट होल्डर ने मला थाम्बवले,"मैडम मेरी मदर को जरा consult करिए ना!" मी जागेवर येउन बसले अणि विचारले "क्या हुवा?" तो म्हणाला,"मम्मी अहिया आओ ने"(आई इकडे येउन बस) एक विधवा बाई त्याच्या बाजुच्या खुर्ची वर येउन बसली....
"मैडम अगर मुझे कुछ हो जाता है तो मैंने जिसे नॉमिनी रखा है उसी को सब कुछ मिलेगा ना?" मी म्हटले "हां"
"आप बताइए ना मेरी मम्मी को.....
आता मात्र मी थोडी गोंधळले....."क्या प्रॉब्लम है?"
हमारी प्रोपर्टी का sale deed बनाया जो मेरे नाम से है क्यों की मम्मी की कोई income नहीं   ना तो     कोई पॅनकार्ड बना है....उसे लगता है के प्रोपर्टी उसके नाम से होनी चाहिए....अब तो sale deed बदलवाने के लिए भी कोई तयार नहीं....मम्मी इस बात से डर गयी है...
मी म्हटले "सेल डीड किसके नाम से बनानी है यह तो आपका नीजी मामला है पर अगर अकाउंट में नॉमिनी उन्ही का नाम है तो आप के बाद अकाउंट का बैलेंस उन्ही का होगा!
"हां तो मैडम मेरे अकाउंट में तो नॉमिनी मम्मी का ही नाम है ना?"
मी लगेच म्हटले "आपका अकाउंट नंबर बताइए अभी चेक करते हैं!"
हे सगले बोलने चालू असताना ती बाई आमची बोलने ऐकत होती...काही न बोलता....
अकाउंट नंबर चेक केल्यावर मला कळले नॉमिनी चे नाव च नाही...
मी म्हटले "इसमें तो नॉमिनी का नाम है ही नहीं..."
हे ऐकले अणि ती बाई रडू लागली....दोन मिनट मला ही काय करावे कलेना....मी त्याना सावरायचा प्रयत्न केला.पण बाईंचे रडणे काही थाम्बेना.मग त्या मुलाने प्रश्न केला तो इसमें नाम add करने के लिए क्या करना पड़ेगा? मी त्याला नोमिनेशन फॉर्म देऊन procedure पूर्ण करून घेतली......
"देखो मम्मी अब मेरे मरने के बाद सब कुछ तुम्हारा ही है......अवे रडवानु बंद कर..केम आहू करे छे!
दोघेही निघून गेले...किती हास्यास्पद गोष्ट होती! पण थोड्या वेळाने मी जेव्हा शांत पणे विचार केला तेव्हा वाटले हसण्यासारखी ही गोष्ट नाही उलट कीव करावी अशी बाब आहे...
आपल्या संस्कृति मधे आई आपल्या पोराबाळांसाठी कष्ट करते..स्वत: चे सुख,विसरून स्वत: ची स्वप्ने विसरून मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटते....इतकेच नाही तर आपल्या मुलाच्या खान्द्या वरून आपला देह उचलला जावा...आपली सगळी सूखे त्याना मिळावी अणि सारी दुखे आपल्याला मिळावी म्हणुन प्रार्थना करते...आज तीच आई आपल्या मुलाच्या मरणाचा विचार करू लागली आहे..
दर वेळी पाश्चात्य संस्कृति ला नावे ठेवणारे अणि हिन्दू संस्कृति च उदो उदो करणार्या व्यक्तिना आपले संस्कार कसे चांगले अणि इतर सगळे कसे वाईट ह्या वर वाद घालणार्या व्यक्ति ना विचारावेसे वाटते...आज तुमच्या संस्काराना संस्कृति ला काय झाले?अशी कशी देवता मानली गेलेली आई मुलाचे मरण चिन्तु लागली?काही ज्ण याला कालाचा महिमा म्हणतील कर्मठ व्यक्ति त्या आई ला दुशणे देऊन मोकळे होतील घोर कलयुग असेही म्हणतील....
कदाचित ह्या घटनेचे वेगळे कंगोरे ही असतील....त्या मुलाचे वागणे कदाचित वर वर चे असेल....किंवा त्या बाई चे वागणे आतताईपणाचे असेल तुम्हाला काय वाटते?
मी फ़क्त एवढेच म्हणेन,नोमिनेशन करून ठेवले आहे का? चेक करा!!

Sunday, 16 August 2015

अश्रु



अश्रु सुद्धा आवश्यक असतात
जितके असते हास्यही
हसु आणि आसु
एकाच नाण्याच्या दोन बाजु
आयुष्यही असेच नाही का,
क्षणात हसु तर क्षणात आसु 

अश्रु कधी दु:खाचे
कधी सुखाचे सुद्धा
अश्रु कधी खचवणारे
कधी बनवतात मजबुतही

अश्रुंशिवाय हास्याची,
किंमत कधी कशी कळेल
अश्रुंशिवाय ह्रुदयाशी
नातं आपलं कधी जुळेल

संवेदना जेव्हा थेट
काळजाला जाउन भिडतात
जन्म होतो अश्रुंचा
आणि अश्रु वाहु लागतात

कधी काही हरवल्याचं दु:ख
कधी अपयशाचं
कधी जिंकुनही हारल्याचं
तर कधी हरुनही जिंकल्याचे

अश्रुंशिवाय आयुष्यात
सर्व काही व्यर्थ आहे
अश्रु आहेत म्हणुनच तर
या जगण्याला अर्थ आहे

दु:ख विसरुन जेव्हा 
सुखात आपण राहु लागतो
हास्याबरोबर आनंदी गाणी 
आपण गाउ लागतो

अश्रु तरी सुद्धा 
पाठ आपली सोडत नाहीत
खळखळुन हसताना
डोळ्यात अश्रु न येता
रहात नाहीत

अश्रु जेव्हा येतील तेव्हा
त्यांना अडवुन ठेवु नका
मनातल्या भावना
कोपर्यात ठेवु नका

अश्रु असतात
मन हलकं करण्यासाठी
दु:खाला सहन करुन
जगण्याची उमेद देण्यासाठी

अश्रु असे जेव्हा
डोळ्यात अचानक येतील 
लक्षात ठेवा दु:खी क्षण
क्षणात विरुन जातील

अश्रु असु दे डोळ्यात
म्हणु नका त्यांना नाही,
कारण,हेच देत असतात
आपल्या जिवंतपणाची ग्वाही!!


Friday, 31 July 2015





२ वर्षांपुर्वीची गोष्ट,स्टोक कांगरी मोहिमेसाठी लेह ला गेले असताना, मोहिम पुर्ण झाल्यावर एक मोकळा दिवस असल्याने सिंधु नदीत राफ़्टिंग करायचं ठरवलं,राफ़्टिंग पोईंट पर्यंत पोहोचल्यावर ग्रुप ची ओळख झाली,बेल्जियमचं Wauter जोडपं,मेक्सिकोची Ana आणि जर्मनीतली Hudora त्याशिवाय इस्राएल च्या दोघी आणि मी अशी आमची टीम होती.
सगळे वेगवेगळ्या देशांचे असले तरीही राफ़्टिंग करता करता आपोआपच मोकळे होत गेलो, त्यात इस्राएली गाण्याने आणखी मजा आणली,इस्राएल मधुन आलेल्या त्या मुलीच्या मागोमाग आम्हाला कोणालाही कळत नसलेलं गाणं आम्हीही म्हणत होतो, हुडोरा हरिद्वार मधल्या एका एन जी ओ मधे volunteering करत होती,ते संपवुन लेह ला फ़िरायला आली होती. Ana धरमशाला इथल्या आश्रमात मेडिटेशन करायला आली होती. राफ़्ट वल्हवताना आजुबाजुचा परिसर रमणीय होताच,आमचं हे राफ़्टिंग सिंधु आणि झांस्कर नदीच्या संगमापाशी पुर्ण झालं आणि आम्ही सगळे दुपारच्या जेवणासाठी जवळच्या camp site वर गेलो,भारतीय बैठक घालुन जेवण करावं लागणार होतं,जेवण वाढल्यावर Ana आणि Hudora नेही व्यवस्थित मांडी घालुन हात जोडले ते बघितल्यावर मी त्यांना विचारलं, " Will you do prayer?" त्यावर Ana ने मला विचारलं, "Do you know any?" मी म्हटलं  येस, आणि हात जोडुन म्हणायला सुरुवात केली, "गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा, गुरु: साक्षात परब्रह्म तस्मैश्री गुरवे नम:"
संध्याकाळी लेह ला परतल्यावर कळलं तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा!

मला अजिबात कल्पना नसतानाही माझ्या तोंडुन ही प्रार्थना म्हटली गेली,कदाचित निसर्गरुपी गुरुनेच ती माझ्याकडुन म्हणवुन घेतली असावी,मी असं अजिबात म्हणणार नाही की चमत्कार झाला पण हा अनुभव थोडा वेगळा होता हे निश्चित!

Saturday, 18 July 2015

वडा पाव

सकाळ सकाळी morning walk ला निघाले असताना कसलासा खमंग सुगंध आला,ओळखीचा! आणि थेट कोलेज च्या दिवसांमधे घेउन गेला बाळु चे आणि "चिंतामणी" चे वडापाव......समोरच्याच दुकानात ताजे लुसलुशीत पाव दिसत होते,आता वड्यांबरोबर कोणितरी त्यावर ताव मारेल,कोलेज मधे असताना "चिंतामणी" वडापाव हा एक न चुकणारा stop होता,वडापावच्या पैजा,टी टी एम एम पार्टी (हा खास कोलेजियन्स चा शब्द!) आणि त्याबरोबर कटिंग चहा!! ह्या combination समोर आजकालचे बर्गर आणि कोक किस झाड की पत्ती!!
खादाडपंती च्या ह्या अशा आठवणींनी हे डाएट, व्यायाम वगैरे सगळे मिथ्या आहे असे तामसी विचार मनात यायला लागले.....छे छे मला वाटते एक जनहितार्थ याचिका दाखल करुन सकाळ सकाळी असे खमंग चविष्ट पदार्थ करण्यावर बंदी आणायला पाहिजे! ह्यात gym च्या corner वर बनलेल्या बेकरी आणि इतर तत्सम दुकानांचा समावेश असला पाहिजे नाहीतर विश्वामित्रांच्या तपश्चर्येचा जसा मेनकेने भंग केला होता तसा कधी आमच्या डाएट तपश्चर्येचा हे पदार्थच भंग करायचे.... what say??

बेस कॅम्प डायरी




बेस कॅम्प डायरी
-------------------
२७ सप्टेंबर २०१४


मुंबई एअरपोर्टकडं प्रयाण केलं. चेक इन,सिक्युरिटी चेक वगैरे सोपस्कार पार पडले आणि विमानानं टेक ऑफ घेतल्यावर मी आणि माझी मैत्रीण मीनाझनं एकमेकींना टाळी दिली. अखेर बऱ्याच ठरवाठरवी आणि तयारीनंतर आमचे पाऊल एकदाचे नेपाळच्या दिशेने पडत होते. विमान दिल्लीला पोहोचले आणी आधी ठरल्याप्रमाणे दिल्लीतल्या मित्राने - ललितने - आम्हाला एअरपोर्टवरून घरी नेलं आणि आम्ही त्याच्या बायकोने बनवलेल्या जेवणावर ताव मारत भरपूर गप्पा मारल्या.
नेपाळचं विमान मात्र बराच उशीर करीत सायंकाळी ६.३० वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं. आमची मैत्रीणरेखा आमचं स्वागत करायला आलीच होती. बीरेंद्र आणि रेखा हे जोडपं इथं एक गायडिंग कंपनी चालवतात. तिनं आधीपासून टॅक्सी बोलावून आम्हाला आमच्या ‘थामेल’मधल्या लॉजमध्ये नेऊन सोडलं. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आला होता त्यामुळे थोडंसं जेवून लगेच झोपायला गेलो.
---
२८ सप्टेंबर २०१४
----------------------
पहाटेच जाग आली ती डोकेदुखीनेच. कालच्या सततच्या प्रवासामुळे आणि dehydration मुळे हे झालं असावं. तरीही बाहेर जावं लागणार होतं. नेपाळ टुरिझम बोर्डच्या ऑफिसमधे पोचलो. इथे वेगवेगळ्या ट्रेक्ससाठी परमिट्स,शिखरांवर चढाईच्या परवानग्या दिल्या जातात.आमच्या ट्रेकसाठी TIMS card (Trekkers Information Management System) असणं जरुरी होतं.हे कार्ड ट्रेकर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.नेपाळची अर्थव्यवस्था शेती आणि पर्यटनावर अवलंबून आहे. जगातील अतिउंचीची शिखरे या देशात आहेत आणी त्यामुळे हा छोटासा देश आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांसाठी महत्त्वाचा आहे.हे adventure tourismपूर्णपणे सुरक्षित बनवण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.
एक छोटासा form भरला आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केली. अवघ्या १० मिनिटांत आमचं काम झालं होतं. त्यानंतर आम्ही बाजारात थोडी खरेदी करायला गेलो. इथे North Face,Mountain Hardware,Marmot असेब्रँडेडकपडे आणि trekking Equipments ची दुकाने आहेत. तुमचं budget कमी असलं तर तुम्हाला नकली गोष्टीदेखील मिळू शकतात.
‘थामेल’ हा भाग लॉजेस,रेस्टॉरंट्स,पब्स, कॅफेज आणिहस्तोद्योगाच्या वस्तूंची दुकाने आदींनी गजबजलेला दिसतो. इथे आल्यावर मला लेहच्या एका मोठ्या स्वरूपाला बघतो आहोत, असंच वाटत होतं.सगळीकडे परदेशी पर्यटक,western music,गजबजलेले cafe's आणि souvenirs  नी भरलेली दुकानं...नुसता फेरफटका मारायचा ठरवला, तरी खूप विविध आणि मजेमजेदार वस्तू बघायला मिळू शकतात आणि तुमचा वेळ अगदी मजेत जातो.

खरेदी आटपून पोटपूजा करायला एका रेस्टॉरंट ‘मोमो हट’मधे जाऊन सूप ‘लसान्या’ नावाचा इटालियन पदार्थ जेवून हॉटेल रूमवर परतलो. थोडा आराम आणि आवराआवरी झाली. संध्याकाळी आधी ठरल्याप्रमाणे ’ख्रिस्तिना’ आली. थोडी नाराज दिसत होती. त्याला कारणही तसंच होतं. ख्रिस्तिना स्पेनच्या केनरी आयलंडची सायकलिस्ट. गेल्या आठ महिन्यांपासुन स्त्री-पुरुष समानतेसाठी सायकलने जगभ्रमणाला सुरुवात केलेली एक जर्नालिस्ट. माझ्याकडे तीन दिवस राहिली होती आणि त्या तीन दिवसांत आम्ही खूप घट्ट मैत्रिणी बनलो. तिला नेपाळहून तिबेटला सायकलनी पोहोचायचं होतं; पण चीनने तिचा व्हिसा नाकारला. केवळ ती एकटी आहे या कारणासाठी. शिवाय त्यातच तिच्या पाठीचं दुखणं अधिकच बळावलं. पाठीत एक छोटी गाठ असल्याचं डोक्टरांच्या लक्षात आलं आणी त्यामुळे तिच्यावर अजूनच निर्बंध आले. तिचा निश्चय अजूनही कायम आहे. तिचीट्रीटमेंटसंपल्यावर ती म्यानमार आणि तिथून इंडोनेशियाला जाऊन तिचा प्रवास सुरुच ठेवणार आहे.तिच्याबरोबर Northfield Cafe मधे गेलो. तिला मी जवळजवळ दोन महिन्यांनी भेटत होते. सगळ्या भावनांचा उद्रेकच झाला. खूप गप्पागोष्टी, खाणे-पिणे...हे क्षण खूपच छान गेले.आम्हाला हे सगळेच क्षण मुठीत घट्ट बंद करुन ठेवावेसे वाटत होते. आम्ही परत कधी भेटू? दोघींनाही माहिती नव्हतं; पण आम्ही एकमेकींसाठी आयुष्यभर टिकेल इतका आनंद निर्माण केला आहे हे मात्र खरं.

२९ सप्टेंबर २०१४
--------------------
उद्या लुक्लासाठी निघायचं असल्यामुळे थोडीफार आवश्यक खरेदी आणि bag packing ही दोन मुख्य कामे होती. त्याशिवाय लेहमधल्या expedition ‘स्टोक कांगरी’चा आमचा स्वैपाकी प्रकाश भेटायला येणार होता. त्या ट्रेकमधल्या त्याने बनवलेल्या चवदार खाण्यामुळे आम्ही त्याचे नाव Delicious ठेवले होते. तर असा हा ‘डेलिशियस’ दोन वर्षांनी मला भेटला. थोडावेळ त्याच्याशी गप्पा मारून इतर बारीक-सारीक कामं उरकली आणि जास्तीचं सामान आमच्या हॉटेलमधेच जमा करून लवकरच झोपून गेलो.

३० सप्टेंबर २०१४
--------------------
शेवटी तो दिवस उजाडलाच. ४:४५ चा गजर वाजला. खरंतर रात्रभर झोप अशी लागलीच नव्हती. ५:३० वाजता बाहेर पडलो.टॅक्सीने डोमेस्टिक एअरपोर्टवर पोहोचलो. विमानतळाला जवळजवळ एखाद्या बस स्टेशनची कळा आली होती. सगळ्या गडबड-गोंधळात तारा एअरलाइन्सच्या एका काउंटरवर थोडावेळ उभे राहिलो. मग तिथून आम्हाला दुसरीकडे जाण्यास सांगितलं. सामान जमा करून बोर्डिंग पासेस घेऊन आत गेलो. फ्लाइट अनाउन्स होऊन आम्ही बसमधे बसलो. एअरपोर्टवर पोहोचून तिथे बराच वेळ नुसतेच थांबल्यावर आम्हाला परत main buildling कडे नेण्यात आलं. विचारल्यावर कळलं, की आमच्या विमानाचं टायर पंक्चर झालं होतं. उडताना नसता तरी land होताना problem होऊ शकला असता.मग जवळजवळ दोन तासांनी आम्ही परत बसमधे बसलो आणि पूर्ण एअरपोर्टला एक फेरी मारून आमच्या छोटेखानी विमानाजवळ आलो. आत बसल्यावर मात्र अजिबात वेळ न घालवता विमानाने take off घेतला होता.
तेनसिंग नोर्गे एअरपोर्ट म्हणूनदेखील ओळखला जाणारं हे विमानतळ सर्वांत भयानक म्हणून गणलं गेलं आहे.
याफ्लाइटबद्दल आणिलँडिंगबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे त्याबद्दल थोडी भीती आणि उत्सुकता दोन्हीही होतं. इथल्या अरुंद आणि उतारावर असलेल्या धावपट्टीमुळं इथे छोटी विमानंच उतरू शकतात. अशा धावपट्टीवर विमान उतरवणे आणी पुन्हा उडवणं यासाठी मोठंच कौशल्य लागतं. आमच्या विमानाने take off घेतला आणी आम्हाला हिमच्छादित पर्वतरांगांवरून ४५ मिनिटांत लुक्लाला आणले. चढत जाणाऱ्या धावपट्टीवर जेव्हा विमान अलगदपणे उतरले, तेव्हा सर्व प्रवाशांनी वैमानिकाच्या कौशल्याला उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली.
सामान घेऊन जवळच्याच एका cafe मधे breakfast करून आमच्या पहिल्या camp कडे चालू लागलो. खरंतर आज मोंजो या ठिकाणी पोहोचायचा विचार होता. परंतु उशिरा पोहोचल्यामुळे‘फाकडिंग’ या ठिकाणी पहिला मुक्काम करायचं ठरवलं. ११ वाजता चालायला सुरुवात केली. खूप सारी वळणे, थोडी चढण आणि थोडा उतार... खालच्या दरीमधून ‘दूधकोसी’ वाहताना दिसत राहते. कित्येक झुलते पूल पार करून आम्ही फाकडिंगला पोहोचलो. ‘स्नोलँड टी हाउस’मधे खोली घेऊन गावात थोडे फिरून आलो.डायनिंग रूममधे बसलो असताना अमेरिकेहून आलेल्या कार्लची ओळख झाली. तो इथून जवळच असलेल्या बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमधे volunteering साठी आला होता. ऑस्ट्रेलियाहून आलेल्या तिघी मैत्रिणी आणी कार्ल यांच्याशी बोलत वेळ पटपट गेला. जेवणं झाल्यावर लवकरच जेवायला गेलो.

१ ऑक्टोबर २०१४
--------------------
आज आम्हाला नामचे बझार या ठिकाणी पोचायचं होतं. सुरुवातीला थोडा चढ आणि उतार चालून झाल्यावर ‘जोरसाले’ नावाच्या गावी जेवणासाठी थांबलो. जोरसालेच्या थोडं अलीकडंच सागरमाथा नॅशनल पार्कसाठीचं entry permit office आहे. जोरसालेनंतर वाट बरीचशी चढावाची असूनही ती खूपच सुंदर, दाट जंगलांतून जाणारी असल्याने उन्हाचा त्रास होत नाही आणि चालणं खूपच सुखकर होतं. नामचेच्या अलीकडंफर्स्ट व्ह्यू पॉइंट आहे. इथं‘माउंट एव्हरेस्ट’चं पहिलं दर्शन घडतं. परंतु आज ढगाळ वातावरणामुळं काहीच दिसत नव्हतं. नामचे बझारची समुद्रसपाटीपासुन उंची ३४५० मीटर असल्यामुळं इथे तुमचं शरीर उंच हवामानाला सरावलेलं (acclimatize) नसेल तर त्रास होऊ शकतो. त्यामुळं बहुतेक जण इथं एक दिवसाची विश्रांती घेतात. ‘एव्हरेस्ट लॉज’मधे थांबलो.


२ ऑक्टोबर २०१४
---------------------

आजआमचा विश्रांतीचा (acclimatization) दिवस होता. सकाळी जवळच असलेल्या View Point ला गेलो. इथून एव्हरेस्ट,लोत्से,अमा-दाब्लम आदी शिखरं दिसली. हे आमचंएव्हरेस्ट’चं पहिलं दर्शन होतं.‘सागरमाथा’ या नेपाळी नावाने आणि ‘जोमोलुन्ग्मा’ यातिबेटी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सर्वोच्च पर्वताने कित्येक जणांना भुरळघातली आणि अजूनही घालत आहे. मनोमन त्याला हात जोडले गेले. ‘ज्याचसाठी केलाअट्टाहासअसं ते वैभवसमोर उभं होतं. ‘एव्हरेस्ट’बद्दल ऐकलेल्या, बघितलेल्याकित्येक सुरस कथा आणि चित्रपट,क्षणभर डोळ्यांसमोर तरळून गेले! यानंतरदेखीलकित्येक वेळा चालताना ‘एव्हरेस्ट’ दिसत राहिले. ‘अमादाब्लम’ला सर्वांत सुंदर पर्वत का म्हणतात, ते कळलं. एक बर्फाच्छादित नसलेले शिखरही दिसत होते. त्याचे नावखुंबिला.या पर्वतामुळेच कदाचित या भागालाखुंबू’ म्हणत असावेत. या ‘खुंबिला’ला नेपाळमधे पवित्र मानतात त्यामुळे त्यावरचढाई करायलाही मनाई आहे.
इथंचएक संग्रहालय आहे. ते बघून हॉटेलवर परतलो. दुपारी बाजारात चक्कर मारतहोतो. नामचे हे एका दरीमधे वरून खालपर्यंत पसरलेलं मोठं गाव आहे. इथेबँका, एटीएम मशिन्स, पोस्ट ऑफिस अशा सोयीदेखील आहेत.जवळच्याच एका पबमधेएव्हरेस्ट’वर एक फिल्म दाखवणार होते, म्हणून मग तिथे पोहोचलो. ‘एव्हरेस्ट’ नावाच्याया फिल्ममधे तेनसिंगचा मुलगा झामलिंगच्या एव्हरेस्ट आरोहणाबद्दलचे चित्रणआहे. ‘एव्हरेस्ट’वर चढाईची स्वप्ने असलेल्या आणि नसलेल्यांनीही पाहावी अशी हीफ़िल्म!
थोडावेळ थोडी टंगळमंगळ करून रूमवर परतलो. उद्या पुढच्या ठिकाणी निघावे लागणार होते.लवकरच झोपायला गेलो.

३ ऑक्टोबर २०१४
----------------------
आज ७ वाजता चालायला सुरुवात केली. काल ज्या view point ला गेलो होतो, त्याच्या दुसऱ्या बाजूने डोंगरावर चढत निघालो थोड्याच वेळात आमचा रस्ता नेहमीच्या बेस कॅम्पच्या route पेक्षा वेगळा झाला आणि छातीवर येणाऱ्या चढाबरोबर आम्ही वर वर चढत निघालो. बराच वेळाने ’फोर्चे थांगा’ या ठिकाणी जेवणासाठी थांबलो. ’शेर्पा स्ट्यू’ नावाचा एक नवीन पदार्थ चाखून बघितला. एखाद्या सूपमधे खूपशा भाज्या, नूडल्स व भात घालून केलेला हा पदार्थ. पुढचे बरेच दिवस हेच आमचं जेवण होतं.जेवणानंतर परत खाली वर, खाली वर अशा कित्येक डोंगररांगा ओलांडत शेवटी ‘डोले’ या ठिकाणी पोहोचलो.डोलेची समुद्रसपाटीपासून उंची आहे ३६४० मीटर. पोहोचे पोहोचेपर्यंत थोडा पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे डायनिंग रूममधे बसून राहण्याशिवाय काहीच करता येणार नव्हतं. जेवणं उरकून लवकरच झोपायला गेलो.

रात्री जवळपास एकच्या सुमारास प्रचंड डोकेदुखीनं जाग आली आणि पाठोपाठ उलट्या... काही क्षण Accute Mountain Sickness ची भीती वाटली.AMS ची लक्षणे काही वेळेस खूप कमी वेळात जाणवू लागतात आणी काही तासांत व्यक्ती मरणसुद्धा पावते, असं ऐकून होते. बऱ्याच केसेस ऐकून होते. त्यातून मीनाझला हे सांगितल्यावर ती अजूनच घाबरली आणि ती अजूनच काहीबाही गोष्टी सांगू लागली...त्या सगळ्यांकडं दुर्लक्ष केलं आणि अशी खात्री होती, की हा त्रास पित्ताचाच होता, तरीसुद्धा लवकर झोप लागेना. मृत्यूची भीती वाटणं काय असतं आणि त्या अनुषंगानं काय काय विचार मनात येऊ शकतात हे त्या रात्री अनुभवलं...मग बऱ्याच उशिरा केव्हातरी डोळा लागला असावा.

४ ऑक्टोबर २०१४
---------------------

उठल्याबरोबर थोडी डोकेदुखी जाणवत होतीच. तरीही पुढच्या ठिकाणाकडे, ‘माछेर्मो’कडे निघालो.आज चालणं फारसं नव्हतं. बरीचशी सरळ वाटच होती. त्यामुळे लवकरच पोहोचलो. माछेर्मो या ठिकाणी IPPG (International Porters Protection Group) ने चालू केलेले पोर्टर शेल्टर आणि रेस्क्यू पोस्ट आहे.रोज दुपारी तीन वाजता इथे Altitude Talk आयोजित केला जातो. अल्टिट्यूड सिकनेस आणी त्याची लक्षणे, त्याबद्दल घ्यायची काळजी याबद्दल सर्व ट्रेकर्सना माहिती दिली जाते United Kingdom मधील काही डॉक्टर्स इथे स्वखर्चाने येउन काम करतात. इथे तब्येतीच्या काही तक्रारी असल्यास त्याबद्दल check up सुद्धा केले जाते.कालचा त्रास आठवून मीदेखील चेकअप करून घेण्याचं ठरवलं. माझी शंका खरी होती. त्रास पित्ताचाच होता.
check up करून लॉजवर परतेपर्यंत white out होऊ लागले होते. उद्याचा ठरलेला rest day रद्द करून गोक्योला जायचं ठरवलं. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘शेर्पा स्ट्यू’ खाऊन लवकरच झोपलो.

५ ऑक्टोबर २०१४
-----------------------
थोडासा चढ आणि सरळ वाटेनं चालत निघालो. थोड्याच वेळात पहिला लेक आणि दुसरा लेक दिसले. निळंशार पाणी आणि त्यासमोर बर्फाच्छादित शिखरं बघून खूप छान वाटत होतं. हा भाग ‘रामसर’ साइट म्हणून जैवसृष्टीसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. दूधकोसी नदीचा संगम असलेले हे तलाव जगातील सर्वोच्च तलावांपैकी आहेत.त्याशिवाय हिंदु आणि बौद्ध श्रद्धेप्रमाणे हे तलाव म्हणजे नागदेवतेचे निवासस्थान आहे. असे हे दोन लेक - गोजुंबा लेक आणि ताउजुंग लेक - पार करून लवकरच गोक्यो लेकला पोहोचलो. इथेच गोक्यो गाव वसलेलं आहे. याच लेकला ‘दूध पोखरी’ असेही म्हणतात. ते कदाचित तिथून होणाऱ्या दूध-कोसी नदीच्या उगमामुळेही असेल. आमचं लॉज लेकच्या समोरच होतं. त्यामुळे डायनिंग रूममधे बसल्या बसल्या आम्ही लेक आणि समोरच्या शिखरांकडे बघत बसलो. उद्या गोक्यो री इथं जायचं असल्यामुळे जेवणं नेहमीप्रमाणे लवकर करून लगेच झोपायला गेलो.

६ ऑक्टोबर २०१४
----------------------
सकाळी ४:३० वाजता उठून गोक्यो री या ठिकाणी जायला निघालो. बाहेर अंधार होता आणि आकाश ताऱ्यांनी भरलेलं होतं. शहरात असं आकाश बघायला मिळणं दुरापास्तच; त्यामुळे डोळे भरून बघून घेतलं. headlamp असल्यामुळे त्या प्रकाशात हळूहळू समोरचा डोंगर चढू लागलो. वर पोहोचल्यावर एव्हरेस्ट,चो-ओयु,ल्होत्से अशा बऱ्याचशा ‘८ थाउजंडर्स’चा सुरेख नजारा दिसतो.’गोक्यो री’ची समुद्रसपाटीपासून उंची आहे ५३६० मीटर. थोडा उजेड होऊ लागला होता आणि आता गोक्यो लेक, त्यासमोरची पर्वत शिखरं आणि ग्लेशियर्स सुरेख दिसत होती.पण आज मला चालायला खूप वेळ लागत होता. खाली येऊन उरलेला वेळ लेकजवळ बसून थोडी फोटोग्राफी करण्यात घालविला. आमच्या ठरलेल्या route ने न जाता मी रस्ता थोडा बदलायचं ठरवलं होतं. त्यानुसार दोन दिवस मी एकटी असणार होते आणि लोबुचे या ठिकाणी आम्ही परत भेटणार होतो. रस्ता बदलण्याचं माझं कारण होतं माझं हळू चालणं. चोला पास ओलांडण्यासाठी जवळ जवळ ८-९ तास खूप तीव्र चढ चढावा लागणार होता. जितका उशीर होईल तितका इथे rock fall,crevases चा धोका वाढत जातो. त्यामुळे मी रस्ता बदलण्याचा निर्णय घेतला. अर्थातच मन द्विधा होत होतं. वाटेत काही त्रास तर होणार नाही? ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी मी काही कारणाने लोबुचे या आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही, तर निरोप देण्याचंकसलंच साधन नव्हतं. मग सगळंच कठीण होऊन बसलं असतं; पण तरीही मी माझ्या निर्णयाशी ठाम राहिले. याआधीसुद्धा कित्येक ट्रेकमधे २२-२५ किलोमीटर चालले होते. मग हे तर काहीच नाही! उद्या मला दोन campsites ओलांडून ’फोर्चे’ या ठिकाणी पोहोचायचं होतं.

७ ऑक्टोबर २०१४
---------------------

सकाळी heavy breakfast करुन मीनाझचा निरोप घेतला दोन दिवसांनी भेटण्यासाठी!
निघाल्यापासूनच मी माझा चालण्याचा वेग वाढवला होता. आज खूप चालायचं होतं आणि सूर्यास्ताच्या आधी पोहोचायला हवं होतं. त्याशिवाय सकाळी जेवढं अंतर कापलं जातं ते नंतर मंदावत जातंच! तिन्ही लेक्स पार करून डाव्या बाजूने डोंगर चढू लागले. माछेर्मो, डोले ही ठिकाणं पलीकडच्या तीरावर उजव्या बाजूला होती. पुढची वाट सरळच होती; परंतु अरुंद आणि निर्जन!आतापर्यंत खूप लोक येता-जाता भेटत होते, पण या वाटेवर मात्र कोणीही नाही.इथून फारसं कोणी जातच नसावं. लवकरच ‘नाला’ या ठिकाणी पोहोचलो. तिथल्या एका घरी शेर्पा स्ट्यू खाऊन पैशांच्या बदल्यात मी माझ्याकडची सूप पॅकेट्स दिली....बार्टर एक्स्चेंज!!
आज रस्त्यात अक्षरश: कोणीच भेटलं नाही!एकूणच आजचा दिवस मी आणि डोंगर यांचा होता.जेवणानंतर ‘थारे’, ’थोरे’ अशी गावे पार करत करत संध्याकाळी ‘फोर्चे’ या गावी पोहोचले. हे गावदेखील बऱ्यापैकी मोठं आहे. बरीच लॉजेस असूनही बरीचशी बंद दिसली. त्यामुळे गावात पोहोचूनसुद्धा लॉज शोधण्यात वेळ गेला. शेवटी ‘फोर्चे रिसॉर्ट’ नावाचं एक लॉज दिसलं आणि इतर माणसांचा वावरदेखील!यालॉजचा मालक everester होता. त्यानं चार वेळा एव्हरेस्ट सर केलं होतं. एप्रिल २०१४ मधे झालेल्या हिमवादळातून वाचलेल्यांपैकी हा एक! त्याचे अनुभव ऐकत आणि इतर लोकांशी थोड्या गप्पा मारून रूमवर जायला निघाले आणि बाहेर चंद्राच्या प्रकाशात चमचमणारे पर्वत दिसले. आज कोजागिरी पौर्णिमा!


८ ऑक्टोबर २०१४
---------------------

आज नाष्टा करून लगेचच निघालो. चालणं फारसं नसलं तरी वेळेत पोहोचायला हवं होतं.थोडा ascent करून मग सरळ वाटेवरुन चालत निघाले. अपेक्षेपेक्षा लवकरच ‘पांगबोचे’ला पोहोचले. शेर्पा स्ट्यूचे जेवण करुन परत माझ्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी- फेरिचेला - निघाले. आज चालताना आकाशात rescue Helicopters देखील खूप दिसत होती. जवळजवळ नऊ हेलिकॉप्टरजाताना दिसली. ‘सोमोरे’ या ठिकाणाहून थोडा चढ आणि मग सरळ वाट चालत फेरिचे इथं लवकरच पोहोचले. इथलं लॉज खूपच छान होतं.अॅटॅच्ड बाथरूम, वॉर्म डायनिंग रूम ह्या सगळ्या इथे लक्झरीच होत्या! मी झोपायला जाईपर्यंत तिथेच बसुन कोरियाच्या ‘ली’ व जर्मनीच्या एका जोडप्याबरोबर गप्पा मारल्या. ली तिच्या कुटुंबाला घेउन आली होती; परंतु इथे तिला स्वत:लाच त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे तिने परत जाण्याचा निर्णय घेतला होता.बऱ्याच उशिरा झोपायला गेले.

९ ओक्टोबर २०१४
----------------------

आज उठायला जरा उशीरच झाला होता. पटपट आवरून लोबुचेकडे निघाले.मी निघाले आणि ‘ली’ लगबगीने माझ्याकडे आली आणि म्हणाली,I wish you all the best for your trek! ती आज परत खाली चालली होती. त्यामुळे थोडी निराश असणार, पण मला शुभेच्छा द्यायला मात्र विसरली नाही...तिचा निरोप घेऊन चालायला सुरुवात केली. थोडी सरळ वाट आणि मग चढण,चढ चढून ‘थुकला’ या ठिकाणी lunch साठी थांबले. इतक्या उंचीवर येऊनदेखील मला भूक लागत होती, ही एक चांगली गोष्ट होती. बऱ्याचदा high altitude sickness मुळे भूक कमी होते आणि त्यामुळे energy देखील!
शेर्पा स्ट्यूचा लंच करून लोबुचेच्या चढणीला लागले.
‘थुकला’नंतर एक डोंगर चढून वर पोहोचलो, की त्या छोट्या पठारावर कित्येक स्मारकं दिसतात. काही नावांच्या पाट्या असलेली, तर काही नुसतीच दगडांवर दगड लावून उभारलेली. ‘एव्हरेस्ट’वर चढताना किंवा उतरताना मृत्यू पावलेल्या गिर्यारोहकांची ही स्मारकं! ही स्मारकं बघून आपोआपच डोळे ओलावतात...काही काळ या समाध्यांसमोर नतमस्तक होऊन मग परत चालायला सुरुवात केली.तीन वाजण्याच्या जवळपास लोबुचेला ठरलेल्या लॉजवर पोहोचले. आमच्या आतापर्यंतच्या प्रवासातलं हे सर्वांत वाईट लॉज होतं हे.मीनाझ आलेली होतीच. कविता रेड्डी आणि तिचा ग्रुपदेखील भेटला. थोडावेळ मीनाझशी गप्पा मारत तिचे अनुभव ऐकले आणि मग झोपायला गेलो.



१० ऑक्टोबर २०१४
----------------------

आज आम्ही शेवटच्या कॅम्पवर पोहोचणार होतो.लोबुचेपासुन चालत थोडी उंची गाठल्यावर पलीकडच्या बाजूला मोरेन आणि स्क्री (सुटे दगड आणि रेती)ची वाट होती आणि उजव्या बाजूला ग्लेशियर्स दिसत होती. त्या उतारावरून जरा जपूनच उतरत गोरकशेपला येउन पोहोचले.हॉटेल हिमालयन लॉजमधे आमचा आजचा मुक्काम होता.
बाजूलाच अजून एक बोर्ड दिसला - Highest Statue of Shivaji Maharaj.हा पुतळा ‘गिरिप्रेमी’ने इथे लावला आहे. त्याचबरोबर शेर्पा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना आर्थिक मदतीसाठी एक charity fund ची व्यवस्था केली आहे. बऱ्याच दिवसांनी मराठीतला तो माहितीफलक आणि शिवाजी महाराजांचा तो पुतळा पाहून खरंचच खूप छान वाटलं.
Restaurant मधे hot lemon मागवलं. पुण्याचे तांबे भेटले. त्यांच्याशी मराठीतून गप्पा मारल्या. थोडी chocolates आणि पाणी भरून घेऊन एव्हरेस्ट बेस कॅम्पचा रस्ता विचारून निघाले. सुरुवातीला सरळसोट वाट लवकरच rocky patches मधून जाणारी, थोडी चढ-उतार असणारी होती. बराच वेळ असं चालून झाल्यावर उजव्या बाजूला ओपन ग्लेशियर्स दिसू लागली. लांबूनच एव्हरेस्ट बेस आणि खूप सगळी माणसं दुरूनच दिसत होती. तिथपर्यंत पोहोचायला मात्र खूपच वेळ लागत होता. शेवटच्या टप्प्यात पॉइंट समोर दिसत असूनही मोरेन आणि ग्लेशियरवाल्या रस्त्यामुळे रस्ता चुकत होता. शेवटी खूपसं मोरेन पार करून जेव्हा पायाखालीच आइस दिसू लागलं आणि काही क्षणांत आम्ही ‘एव्हरेस्ट बेस’ला पोहोचलो...तो क्षण केवळ अविस्मरणीय होता. सगळ्या कष्टांचं अश्रूंमध्ये रूपांतर होऊन ते माझ्याही नकळत वाहू लागले...आता तिथली गर्दी पूर्णपणे संपली होती. तो पॉइंट,आजूबाजूचा परिसर... सगळं डोळ्यांत साठवून घेतलं...!

एव्हरेस्ट बेस कॅम्पची उंची आहे ५३०० मीटर!
खरंतर यापॉइंटच्याही खूप पुढे गेल्यावर खरा बेस कॅम्प लागतो. चढाईच्या मौसमात तिथे जायला बरा रस्ता बनवला जातो.आज मात्र दूरवर एकच छोटा तंबू उभारलेला दिसत होता. तो एका फिल्म बनवणाऱ्या कंपनीचा होता, असं नंतर कळलं.
मी तिथे पोहोचले तेव्हातीन वाजून गेले होते. थोडावेळ तिथेच थांबलो होतो. लवकरच परत निघायला हवं होतं. तेवढ्यात तिथं एक भारतीय कुटुंब आलं. त्यांच्यासोबत त्यांचा गाइडही होता. मी एकटीच आहे, म्हटल्यावर त्यातली मुलगी म्हणाली, you can come along with us! मलासुद्धा कोणी तरी हवंच होतं. मी त्यांच्याबरोबर परतीच्या वाटेला लागले. आम्हाला वाटेतच अंधार झाला होता. पण गाइड अर्जुन रस्त्याचा चांगला माहितगार असल्यामुळे अजिबात न चुकता आम्ही गोरकशेपला परत आलो. अर्थात मला उशीर झाल्यामुळे मीनाझ काळजीत पडली होतीच आणि दिवसभर चालणं झाल्यामुळे मी प्रचंड थकले होते.त्यामुळे थोडं सूप पिऊन लगेच झोपायला गेले.

१२ ऑक्टोबर २०१४
-----------------------
कालचा दिवस आरामाचा होता. मी ‘कालापत्थर’ला जायचं रद्द करून लॉजवरच राहिले. आज परतीच्या प्रवासाला निघायचं होतं आणि सरळ ‘फेरिचे’ गाठायचं होतं. खाली उतरायचं असल्यामुळे चालणं कठीण नव्हतं. ग्लेशियर पार करून, डोंगर उतरून, लोबुचेला लवकरच पोहोचले. जवळच्याच एका लॉजवर ‘हॉट लेमन’ घ्यायला गेले आणि समोरच दिसली,माझ्या बरोबरच गोरकशेपला आलेली एक इस्रायली मुलगी. ती आता परतत होती आणि ऑक्सिजन मास्क लावून तिला बसवलं होतं. ‘हाय अल्टिट्यूड’मुळं तिला श्वास घ्यायला त्रास होत होता.तसंही रोजच rescue helicopters येता जाताना दिसत होती. बऱ्याच जणांनी गोरकशेपहून खाली उतरायच्या ऐवजी चार्टर हेलिकॉप्टर केलं होतं.
‘थुकला’ला पोहोचल्यावर थोडावेळ विश्रांतीसाठी थांबले, तर तिथंदेखील काही australian बायका अल्टिट्यूड सिकनेसने हैराण होत्या.जास्त वेळ तिथे न थांबता डोंगर उतरू लागले. साधारण तासाभरात फेरिचेला पोहोचले. सामान ठेवून थोडी भूक भागवल्यावर नुसतंच डायनिंग रूममध्ये बसून राहायचा कंटाळा आला होता. मग थोडी बाहेर पडले. आमच्या हॉटेलमालकाशी गप्पा मारत होते, तेव्हाच समोरून येणाऱ्या माणसाकडं बघून तो म्हणाला,"Oh! look who we have! peter!!" पीटर इटलियन होता आणि इथून जवळच असलेल्या ‘ग्लास पिरॅमिड’च्या ऑब्झर्व्हेटरीमधे शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होता. नेपाळचा हा भाग म्हणजे त्याचे दुसरे घरच जणू. त्याची ओळख करून घेऊन त्याच्याशी गप्पा मारत असताना तो म्हणाला,"We are expecting a cyclone from India!....but you don't have to worry as you are going down!you will have some rains on the way!" ‘हुदहुद’ची ही पूर्वसूचना होती, हे नंतर काठमांडूला पोहोचल्यावर कळलं.आकाशाचे रंग बदलत होते. त्याचबरोबर समोर दिसणाऱ्या शिखरांवरदेखील सोनेरी रंग झळकत होता. "not everyone can see this beauty!" हे पीटरचं म्हणणं किती खरं होतं! त्या सौंदर्याला जमेल तसं डोळ्यांत आणि कॅमेऱ्यामधे बंदिस्त केलं..हळूहळू अंधार वाढत गेला. परत डायनिंगमधे जाऊन व्हेज मोमोज खाता खाता इतर लोकांशी गप्पा चालू होत्या. तेवढ्यात जवळच्या medical post मधली एक डॉक्टर आली आणि तिने विचारलं,"anyone can speak and understand chinese here?" तिच्या दवाखान्यात एक चायनीज बाई अल्टिट्यूडचा त्रास होतो, म्हणून आली; पण तिला अजिबात इंग्लिश बोलता येत नव्हतं. अनुवादकाची मदत घेऊन डॉक्टर तिला समजवायचा प्रयत्न करत होती, कीपुढं जाणं तिच्या प्रकृतीच्या दृष्टीनं धोकादायक ठरू शकेल.तिनं खाली परत जाणं हितावह होतं; परंतु बाई हट्टी वाटत होती. तिला कोणत्याही परिस्थितीत वरपर्यंत जायचंच होतं...अशा किती जणांच्या आशा-आकांक्षा, अतिआत्मविश्वासाने क्षणात धुळीला मिळाल्या असतील! शेवटी निसर्गाचा यथोचित आदर करणंच आपल्या हातात आहे, हेच खरं! निसर्गाचा कौल मान्य करावाच लागतो.




१३ ऑक्टोबर २०१४
-----------------------

कालचं भाकीत ऐकून आम्ही आज लवकरच निघायचं ठरवलं होतं;कारण आज उतार असला तरी अंतरही खूप होतं आणि त्यामुळे वेळेत पोहोचणं आवश्यक होतं. फेरिचेहून निघालो, तेव्हा थंडी होती. सूर्योदय व्हायचा होता, म्हणून असेल असं वाटलं. आजचा आमचा मुक्काम होता ‘नामचे’ला. सरळ आणि दरीच्या कडेने जाणारी सुंदर वाट चालत ‘पांगबोचे’ला पोहोचलो. वातावरण ढगाळ होतं. सूर्यसुद्धा उगवल्यापासुन ढगाआडच होता. त्यामुळे थंडी जास्तच जाणवत होती. पीटरचे शब्द आठवले...वातावरण खराब व्हायला लागलं होतं, ‘पांगबोचे’ला उतरून ‘देबुचे’ला पोहोचले. हे एक छोटंसं गाव आहे. इथे खरं म्हणजे जेवायला थांबायला हवं होतं; पण झपाट्याने बदलत जाणारं हवामान बघून शक्य तितक्या लवकर पोहोचायला हवं, असं ठरवुन चालत राहिले. देबुचे ते ‘तेंगबोचे’ दरम्यान खूप दाट आणि सुंदर ऱ्होडोडेंड्रॉनचं जंगल लागतं.खूपसे पक्षी जणू माझ्यासाठीच समोरून उडत होते. हा रस्तादेखील फारशी वर्दळ नसलेला, ‘तेंगबोचे’नंतर ‘फोर्चे थांगा’ या नदीच्या जवळच्या गावापर्यंत तीव्र उतार आहे. उतार म्हटलं, की गुडघ्यांची वाट!! वर चढताना जितकं नाही, तितकं लक्ष उतरताना द्यावं लागत होतं. थोडं लक्ष इकडे तिकडे गेलं की पाय घसरलाच! त्यात बारीक बारीक पाऊसही सुरू झाला.थोडासा पडून थांबेल असं वाटणारा पाउस वाढतच चालला होता.शेवटी ‘फोर्चे थांगा’ला एका लॉजमधे थांबले.सकाळी ब्रेकफास्टनंतर पोटात काहीच नव्हतं. ‘हॉट लेमन’ मागवलं. हेतू हा, की तोवर पाऊस थांबतोय का ते बघावं. डायनिंग रूममधे एका मोठ्या जॉर्डनियन ग्रुपशी ओळख झाली. त्यांच्यातल्या ‘मझडेल’शी बराच वेळ गप्पा मारल्या.मी इंडियाहून आले आहे, म्हटल्यावर तिने सलमानखान,शाहरुखखान अशा स्टार व्यक्तींची नावे घेऊन हिंदी पिक्चर आणि कलाकार कसे फेमस आहेत, हे सांगितलं! सर्वांत लोकप्रिय कलाकारांमधे तिथेसुद्धा अमिताभ बच्चनचीच वर्णी लागलेय! ही मंडळीही ‘नामचे’ला निघाली होती. त्यामुळं मागून येणारं कोणीतरी आहे या मानसिक समाधानात त्यांचा निरोप घेऊन निघाले. पाऊस न थांबता उलट अजूनच वाढला होता. त्यामुळे माझा रेनकोट इरल्यासारखा चढवून चालायला सुरुवात केली. आता नदीवरचा पूल ओलांडून थोडा चढ चढून मग सरळ वाट होती. हा चढ वाटला होता त्यापेक्षा कमी होता आणि चालणं सुखकर होतं. पाऊस पडत असल्यामुळं हवामान थंडगार बनलं होतं आणी लवकरच सरळ वाटेला लागून डोंगरांमागुन डोंगर ओलांडणं चालू झालं. पुढचं वळण गेलं, की आलंच ‘नामचे’... असं वाटत होतं; पण ‘नामचे’चे ‘नामोनिशाण’ही कुठं नव्हतं.
बऱ्याच डोंगरांना वळसे घालून शेवटी पाच वाजता ‘नामचे’ला पोहोचले. आता पाऊस कमी होत होता. ‘नमस्ते लॉज’मधे पोहोचले, तेव्हा सणसणून भूक लागली होती. त्यामुळे गरमागरम fried Rice खाऊन अंधारू लागलेल्या ‘नामचे’ला खिडकीतून बघत वेळ छान गेला. आजचं हे लॉज घरगुती होतं. एका नेपाळी कुटुंबाने चालवलेलं. त्यामुळं त्यांचं बुद्धाचं प्रार्थनाघरसुद्धा बघता आलं. उद्या आम्ही ‘नामचे’लाच राहणार होतो.

१४ ऑक्टोबर २०१४
------------------------
एका दरीमधे खालून वर पसरलेल्या या गावात बरंच काही करण्यासाठी होतंआणि आमच्याकडे एक दिवस हाताशी होता. त्यामुळे लुक्लाला जाऊन थांबण्यापेक्षा‘नामचे’ला एक दिवस द्यावा, असं ठरलं. त्यामुळे एकूणच दिवस थोडा आरामातच चालू झाला. ‘साउथ वेल्श’चा एक ग्रुप ओळखीचा झाला होता. त्यांच्याबरोबर ‘एव्हरेस्ट ८८७८ कॅफे’मधे पिझ्झा पार्टी करून झाल्यावर मार्केटमधे फेरफटका मारला. थोडीशी खरेदी केली.आयरिश कॅफे नावाच्या एका पबमधे Into Thin Air बघायला गेलो. इन्स्टिट्यूटमधे हा चित्रपट बघितला होता आणि आपण हा कोर्स का करतोय, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला होता. पहाडांमधे attitude आणि Ignorance घेऊन गेल्यावर काय भयंकर घडू शकतं हे दाखवणारी ही सत्य कथा. फार जुनी नाही...Rob Hall नावाच्या एका अतिशय कुशल गिर्यारोहकाचे प्रोफेशनल क्लायंट्स आणि एका हिमवादळात त्या सर्वांचा झालेला मृत्यू एका वास्तवाची जाणीव करुन देतो, ते म्हणजे इथे नियमांचं पालन काटेकोरपणे करावंच लागतं. पिक्चर संपवून बाहेर पडेपर्यंत पाउस सुरू झाला होता. आमचं लॉज तसं जवळच होतं. त्यामुळे पळत पायऱ्या चढायला लागले, तर जोरदार धाप लागली आणि मग लक्षात आलं आपण अल्टिट्यूडवर आहोत;समुद्रसपाटीवर नाही!!
उरलेली संध्याकाळ पावसाला सुरुवात झाल्यामुळे डायनिंग रूममधेच बसावं लागलं. बाहेर पाऊस वाढत होता आणि आम्ही गरमागरम जेवणाबरोबर ‘छांग’चे (तांदळाची दारू)घुटके घेत पावसाचा आनंद घेत बसलो होतो. आमच्या हॉटेलमालकाने हा पाऊस अजून ४-५ दिवस थांबणार नसल्याचं भाकीत केलं होतंच. पण तरीही आम्हाला उद्या ‘लुक्ला’ला पोहोचायला हवं होतं; कारण १६ तारखेचं आमचं परतीचं विमान होतं. त्यामुळे पावसाला म्हटलं, ‘आज रात्रभर जे पडायचं ते पडून घे रे बाबा! उद्या मात्र आकाश मोकळं असू दे!’

१५ ऑक्टोबर २०१४
-----------------------

सकाळी उठून पाहिलं, तेव्हा पाऊस थांबलेला होता आणि छान ऊन पडलं होतं. पावसानं आमचं ऐकलं होतं म्हणायचं! नाश्ता करून उतरायला सुरुवात केली. TIMS च्या चेक पोस्ट पाशीच आमची परमिट्स पुन्हा एकदा तपासण्यात आली आणि त्यांच्या वहीत ‘एक्झिट’ची नोंद केली. तिथेच ट्रेक पूर्ण केल्याचं certificate सुद्धा मिळत होतं.बराच उतार उतरून ‘फाकडिंग’ला पोहोचायचं होतं. वाटेत याक खेचरं आणि उतरणाऱ्या लोकांची अक्षरश: गर्दी झाली होती. त्यामुळे त्यातून वाट काढण्यात बराच वेळ गेला. फाकडिंगला पोहोचून कॉफी पिऊन परत वाटचालीला सुरुवात केली. लुक्लाची वाट उताराची असली, तरी अंतर बरंच होतं आणि अंधाराच्या आधी तिथे पोहोचणं आवश्यक होतं. मजल-दरमजल करत शेवटी एका ब्रिटिश आजोबांनी जेव्हा सांगितलं you are almost there!...तेव्हा थोडं बरं वाटलं.सहा वाजेपर्यंत ‘हॉटेल पॅरेडाइज’मधे पोहोचले. आज आमचा ट्रेक संपला होता. डायनिंगमधे बसले असताना बऱ्याच जणांशी ओळखी झाल्या. अमेरिकेचे रिक आणि लिसा दोन दिवसांपासून फ्लाइट्स नसल्यामुळे अडकून पडले होते. तीन युरोपियन मित्रांचाही बराच दंगा चालला होता. बराच वेळ त्यांच्याशी गप्पाटप्पा करण्यात गेला.गेल्या दोन दिवसांपासून धुक्यामुळे विमान उड्डाणे झाली नव्हती. उद्याचे आपले विमान वेळेत काठमांडूसाठी उडेल, अशी आशा करत बिछाना गाठला.

१६ ऑक्टोबर २०१४
-----------------------

आज जाग आली तीच विमानांच्या आवाजाने! जवळच असलेल्या एअरपोर्टवर पोहोचून चेक इन करून आमच्या नावाचा पुकारा होण्याची वाट बघत विमाने बघत बसलो.दोन दिवसांचा backlog असल्यामुळे बरीच गर्दी होती; तरीही इथले कर्मचारी व्यवस्थित कसलाही गोंधळ न होऊ देता सगळं सांभाळत होते.९.३० वाजता आमच्या विमानाचा क्रमांक पुकारला गेला आणि पुढच्या
दहा मिनिटांत विमान धावपट्टीवर उड्डाणासाठी तयार होतं. vertical drop असलेला take off अनुभवणंदेखील रोमांचक होतं.आमच्या विमानाने काठमांडूच्या दिशेने झेप घेतली होती आणि आम्ही आमच्या छोट्याशा विमानातून दिसणाऱ्या हिमाच्छादित शिखरांचं पुन:पुन्हा डोळे भरुन दर्शन घेत होतो.
... एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करणं जर पंढरीच्या वारीला जाण्यासारखं असेल, तर एव्हरेस्ट चढून परत येणं म्हणजे सदेह वैकुंठाला जाऊन परत येण्यासारखं आहे.या सर्व एव्हरेस्टवीरांना सलाम!
---   

२८ जुन २०१५ वसई एड्वेंचर क्लब बरोबर पावसाळी ट्रेक साठी गंभीरगडावर गेले होते,वर्षातला पहिला ट्रेक असल्यामुळे सभासद संख्या जास्तच होती तब्बल ११९....
पाटीलवाडी या पायथ्याच्या गावापासुन चढायला सुरुवात केली, गडावर मधमाशांची पोळी आहेत त्यामुळे जरा जपावे लागेल अशी सुचनाही मिळाली होती,परंतु गडावर चढायला सुरुवात केली आणि आजुबाजुच्या गावातल्या आदिवासी पोरे पोरींचेच मोहोळ उठल्यासारखे वाटु लागले,माशा घोंघावल्यासारखे ते पुढे मागे घोंघावत होते,मोबाईल वर कर्कश्श आवाजातली गाणी कमी पडत होती म्हणुन की काय त्यांच्याही बेंबीच्या देठापासुन केकलत राहीले,
ट्रेकींग करताना बर्याचदा नवखे ट्रेकर्स असा आरडा ओरडा करतात,दारुकाम आणि दंगा करतात हे ऐकलं आणी बघितलं होतं ह्याउलट तेथील स्थानिक गावकरी मात्र या मुळे त्रासुन गेलेले असतात, टुरिस्ट गडावर कचरा करतात आणी ग्रामस्थ तो साफ़ करतात असं अनेक लेखांमधे बातम्यांमधे वाचलंय पण या वेळेस प्रकार उलटा होता,आमच्या ग्रुप च्या लीडर ने कुठलेही "रंगीत द्रव्य" पदार्थ जवळ बाळगायचे नाहीत अशी सक्त ताकीद दिलेली होती, आणी ह्या "माश्या" प्रत्येक हातात शीतपेये आणी कसली कसली पेये,चकणा अशी सगळी जय्यत तयारी घेउन वर चढत होत्या.
गड अर्धा चढुन वर पोहोचलो आणि निमुळत्या वाटेवर ट्रैफ़िक जैम झाला होता,ट्रेकर्स शिस्तीत ओवरटेक न करता चढत असताना ही मंडळी कशीही घुसत होती आणि इतरांना गोंधळात टाकत होती.....गडावर शांततेच्या शोधात निघालेल्या आम्हाला क्षणभरही शांतता मिळत नवती जिथे पहावे तिथे ही प्रजा आणि त्यांचे कर्कश्श चीत्कार!
गडावरुन दिसणारा खालचा परिसर अतिशय मनोहारी होता पण त्याला गालबोट लागलं होतं ह्यांचं,
गडावरुन खाली उतरताना साहजिकच बाटल्या आणि इतर खाद्यपदार्थांची पाकीटं रिकामी होउन गडावर फ़ेकली जाउ लागली आणि आमच्यातल्या ट्रेकर्स नी ती उचलायला सुरुवात,जवळ जवळ तीन चार पिशव्या कचरा आणि प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करुन खालपर्यंत आणल्या.....
महाराष्ट्रातल्या कित्येक गडकिल्ल्यांच्या संरक्षणाची आणि साफ़ साफ़ाईची जवाबदारी तिथल्या गावकर्यांनी स्वीकारली आहे,प्रसंगी बेजवाबदार पर्यटकांचे कानही उपटले आहेत,पण जेव्हा परिस्थिती अशी उलट होते तेव्हा काय करायचं?
मधुवंती गोडसे