Wednesday, 17 August 2016

पिल्लु



साधारण सहावी सातवी मधे असावं, परुळेकर मधे जायला सुरुवात केली होती.शाळेतुन परत येताना रस्त्यात नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारती आणि तिथल्या मजुरांनी पाळलेली कुत्री मांजरं दिसायचं,प्राण्यांबद्द्ल आकर्षण होतंच पण आई बाबा दोघेही नोकरी निमित्त बाहेर असल्यामुळे त्यांचं करणार कोण? त्यामुळे प्राणी पाळता येत नवते,
तर आम्ही मग ह्या कुत्र्यांशी त्यांच्या पिल्लांशी खेळायला सुरुवात केली,तेव्हा मला ५० पैसे असा पोकेट्मनी मिळायचा,पेरु बोरं वगैरे खाउन उरलेल्या काही पैशांमधे तेव्हा छोटी छोटी बिस्किट्स मिळत....मग ती विकत घेउन ह्या पिल्लांना खायला द्यायची असा उद्योग सुरु झाला.
काही दिवसांनी मात्र त्यांच्याशी खेळायचा वेळ अपुरा वाटु लागला असावा आणि पिल्लाला कायमच जवळ ठेवण्याच्या मोहापायी एक दिवस त्यातल्या एका पिल्लाला उचलुन घेउन आले....त्याला दुध देणं खेळणं झाल्यावर त्याला आता घरात ठेवता येणार नाही ह्याचं भान आलं म्हणुन मग आमच्या गैलरी च्या खाली एका खोक्यात त्याला ठेवायचं असं ठरलं.....
दिवस असा गेला, मात्र रात्र झाली आणि ते पिल्लु ओरडायला लागलं आणि ते आई बाबांना ऐकु आलं आणि मग आमचा त्याला आणल्याबद्दल चा कबुली जवाब घेतला आता ओरडा ठरलेलाच होता,
रात्रीचे १० वाजले असावेत आणि बाबांनी फ़र्मान काढलं, "ते पिल्लु जिथुन आणलं तिथे ठेवुन ये! त्याला त्याच्या आई ची आठवण येत नसेल का? तुला जर कोणी आई बाबांपासुन दुर केलं तर?"
आज खरंतर हे वाक्य आणि त्याचा अर्थ जास्त जाणवतो! कोणा पिल्लाला त्याच्या आई बापा पासुन तोडणं किती भयंकर असु शकेल....कल्पना देखील करवत नाही!
खरंतर रात्री जाणं आणि पिल्लाला परत देणं जीवावर आलं होतं पण हुकुमाची तामिल करण्याशिवाय पर्याय नव्हता! मग काय माझी आणि आई ची वरात त्या पिल्लाला घेउन निघाली त्या बिल्डींग पाशी पोहोचुन पिल्लाला त्याच्या आई कडे स्वाधीन करुन आम्ही परत आलो होतो.......रडं संपलं होतं
थोड्याच वेळात दोन्ही पिल्लं आपल्या आई च्या कुशीत गाढ झोपुन गेली होती!!

मधु