Wednesday, 17 August 2016

पिल्लु



साधारण सहावी सातवी मधे असावं, परुळेकर मधे जायला सुरुवात केली होती.शाळेतुन परत येताना रस्त्यात नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारती आणि तिथल्या मजुरांनी पाळलेली कुत्री मांजरं दिसायचं,प्राण्यांबद्द्ल आकर्षण होतंच पण आई बाबा दोघेही नोकरी निमित्त बाहेर असल्यामुळे त्यांचं करणार कोण? त्यामुळे प्राणी पाळता येत नवते,
तर आम्ही मग ह्या कुत्र्यांशी त्यांच्या पिल्लांशी खेळायला सुरुवात केली,तेव्हा मला ५० पैसे असा पोकेट्मनी मिळायचा,पेरु बोरं वगैरे खाउन उरलेल्या काही पैशांमधे तेव्हा छोटी छोटी बिस्किट्स मिळत....मग ती विकत घेउन ह्या पिल्लांना खायला द्यायची असा उद्योग सुरु झाला.
काही दिवसांनी मात्र त्यांच्याशी खेळायचा वेळ अपुरा वाटु लागला असावा आणि पिल्लाला कायमच जवळ ठेवण्याच्या मोहापायी एक दिवस त्यातल्या एका पिल्लाला उचलुन घेउन आले....त्याला दुध देणं खेळणं झाल्यावर त्याला आता घरात ठेवता येणार नाही ह्याचं भान आलं म्हणुन मग आमच्या गैलरी च्या खाली एका खोक्यात त्याला ठेवायचं असं ठरलं.....
दिवस असा गेला, मात्र रात्र झाली आणि ते पिल्लु ओरडायला लागलं आणि ते आई बाबांना ऐकु आलं आणि मग आमचा त्याला आणल्याबद्दल चा कबुली जवाब घेतला आता ओरडा ठरलेलाच होता,
रात्रीचे १० वाजले असावेत आणि बाबांनी फ़र्मान काढलं, "ते पिल्लु जिथुन आणलं तिथे ठेवुन ये! त्याला त्याच्या आई ची आठवण येत नसेल का? तुला जर कोणी आई बाबांपासुन दुर केलं तर?"
आज खरंतर हे वाक्य आणि त्याचा अर्थ जास्त जाणवतो! कोणा पिल्लाला त्याच्या आई बापा पासुन तोडणं किती भयंकर असु शकेल....कल्पना देखील करवत नाही!
खरंतर रात्री जाणं आणि पिल्लाला परत देणं जीवावर आलं होतं पण हुकुमाची तामिल करण्याशिवाय पर्याय नव्हता! मग काय माझी आणि आई ची वरात त्या पिल्लाला घेउन निघाली त्या बिल्डींग पाशी पोहोचुन पिल्लाला त्याच्या आई कडे स्वाधीन करुन आम्ही परत आलो होतो.......रडं संपलं होतं
थोड्याच वेळात दोन्ही पिल्लं आपल्या आई च्या कुशीत गाढ झोपुन गेली होती!!

मधु

Friday, 22 July 2016

Airlift






परवा Airlift पाहिला,सद्दाम हुसेन ने कुवेत वर हल्ला केल्याचा तो ९० चा काळ,बघताना माझं बालपण आठवलं,नुकतच मोठ्या शाळेत पाचवी सहावीत गेल्या मुळे घर ते शाळा असं चालत जाण्याचं अंतर वाढलं होतं,त्या काळी स्कुल बस चा प्रघात नसल्यामुळे असेल कदाचित, बहुतेक सगळेच चालत ये जा करत. मोठी मुले मुली फ़ार फ़ार तर सायकल घेउन फ़िरायची.
शाळेतुन परत येताना आमचा छोटा ग्रुप असायचा,सद्दाम हुसेन आणि इराकी युद्द्ध यांच्या बातम्या आमच्या पर्यंत पोहोचत होत्याच,त्या घटनांचा आम्ही आमच्या कुवती नुसार अर्थ लावत होतो,सद्दाम अगदी आमच्यातलाच एक असल्या सारखे त्याचे काय चाललेय आणि आता तो काय करायच्या विचारात आहे याच्या चर्चा चालायच्या,त्यातुन सद्दाम हुसेन ने त्याचे अजुन ६ डुप्लिकेटस कसे बनवले आहेत,मग अमेरिका त्याला पकडुच शकत नाही मग तो bombs कसे प्लांट करणार आहे अशा गोष्टी बोलल्या जायच्या,हा प्रभाव त्याकाळच्या बातम्या आणि आजुबाजुला कानावर पडणार्या बोलण्यावरुन असायचा,पण तेव्हाच्या त्या चर्चा मोठ्यांच्या पेक्षाही जास्त गंभीरपणे चालु असायच्या, अशा गप्पा आणि सद्दाम हुसेन आणि युद्धाच्या कल्पना करत रस्ता कधी सरायचा ते कळायचं नाही,
किती सुखी दिवस होते....कसली चिंता नाही ताण तणाव नाहीत जगात चाललेल्या घडामोडींच्या बद्दल फ़ार भितीही नाही आमचं बालपण असं साधं सुधं आणि सुरक्षितही होतं याचं आता सुख वाटतं!!

24th January 2016

मोगरा










खरं तर बऱ्याच दिवसांनी गच्चीवर गेले होते. गच्चीवर लावलेल्या झाडांना भेटायला! बघते तर शेवंती, गुलाब छान हसत होते; पण मोगरा मात्र पार सुकून गेला होता. त्याच्याकडं बघून खूप वाईट वाटलं आणि स्वत:चाच राग आला. मनाशी म्हटलं, ‘माझंच दुर्लक्ष झालं. रोज नियमित यायला हवं होतं... गेला आता, सुकला माझा मोगरा!!’
त्यानंतर नित्यनेमाने झाडांना पाणी घालण्याचा क्रम सुरू ठेवला. परवा बघितलं तर काय! मोगऱ्याच्या त्या सुकलेल्या कुंडीतुन एक हिरवागार कोंब डोकावत होता. मोगरा जिवंत होता. त्याने परत अंग धरलं.
आपलं आयुष्य पण असंच असावं, नाही का? जरी खत पाणी मिळालं नाही काही दिवस, सूर्यप्रकाश दिसला नाही कित्येक दिवस, तरी तग धरून राहायला हवं. फक्त या आशेवर की पुन्हा दिवस उजाडेल... पुन्हा ऊन पडेल आणि आपल्या आयुष्याला उमेदीचे नवीन धुमारे फुटतील... माणूस कशावर जगत असतो? हवा, पाणी, अन्न....नातेवाइक की मित्रमंडळ? मला वाटतं माणूस फक्त आशेवर जगत असतो... चांगलं घडण्याची आशा,नवीन व्यक्तींची आशा,आणि अशी बरीच कारणं...
हाडं गोठवणारी थंडी असते. वर-खाली सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला असतो. तरीही गिर्यारोहक मात्र एक एक पाऊल टाकत असतो. कदाचित त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षासुद्धा त्याच्या मनातली आशा त्याला शिखरावर पोहोचण्यास मदत करते. आशेवर अनेक संसार चालतात आणि अनेक व्यवसायही... आशावादामुळे जाहिरातींचा बाजार वाढतो आणि जाहिरातींमुळे आशा... आता हा जाहिरातींचा बाजार चांगला की वाईट हे ज्याचं त्याने ठरवायचं... एवढंच काय, तर बऱ्याच भोंदूबाबांचे आध्यात्मिक व्यवसायही माणसांच्या आशा-आकांक्षांशी खेळ करत चालतात. hopes वर माणूस आख्खं आयुष्य कोणाची तरी वाट बघू शकतो. खडतर कष्टप्रद जीवन जगू शकतो आणि धीर धरू शकतो... आशावादी असायलासुद्धा खुप बळ असावं लागतं; कारण निराशावादी लोक नकारात्मक विचार करतात, self destroying... आत्मघाती बनतात किंवा स्वरस नसलेल्या बांडगुळासारखे जगत राहतात. कधी कुठल्या व्यसनात स्वत:ला गुरफटून घेतात आणि आयुष्याची माती करून घेतात... आशा, स्वप्नं ही कधी दुसऱ्यांच्या हिशेबात कितीही अवास्तव असली... तरीही आपल्यासाठी ती सर्व काही असतात. ती उराशी बाळगून जगलं पाहिजे. फुलांबरोबर काट्यांचीही तयारी ठेवली पाहिजे... समस्या असतात, ताण-तणाव असतात; पण त्यांचा तोडगाही असतोच, तोही आपला आपल्याकडे... त्यामुळे आशावादी राहा मित्र आणि मैत्रिणींनो... कारण आयुष्य खुप सुंदर आहे... अगदी मोगऱ्याच्या फुलासारखं!!


सांग सांग भोलानाथ

लहानपणीची आठवण....साधारण ९०-९२ साल असावं....परुळेकर शाळेतले दिवस ११ वाजताच्या शाळेसाठी १०.३० पर्यंत तरी निघावं लागे त्यादिवशी गुरुवार होता बाबांची सुट्टीचा दिवस....तेव्हा केबल सुद्धा नवीन होतं आणि केबलवाल्याकडुन दाखवल्या जाणार्या फ़िल्म्स चं अप्रुप वाटायचं...कारण तेव्हा आजच्यासारखे ढिगभर च्यानल्स नवते आणि थियेटर मधे जाण्याची सक्त मनाई!
त्यादिवशी केबलवाल्याने ’रोजा’ लावला होता,चित्राच्या बारिक आवाजात ’दिल है छोटासा......  बघुन झाल्यावर जड पायांनी निघावं लागलं होतं.....कारण पिक्चर सोडवत नवता पण शाळेला सुट्टीदेखील घेता येणार नवती.....मग काय चालत जाताना डोक्यात तेच विचार घोळत होते....पाउस जोरदार सुरु होता.....शाळेत जाण्याच्या उत्साहाचा आनंदच होता त्यात आज अजुनच मुड ओफ़ ची भर पडली होती.....
शाळेजवळ पोहोचत होतो आणि काही मुलं मुली परत येताना दिसली आणि मग नंतर बरीच.....आमच्या वर्गातली दिसल्यावर त्यांनी सांगितलं "वडगाव कामशेत ला खुप पाउस पडला आणि त्यामुळे लोकल्स बंद आहेत....तिथुन येणारी मुलं येउ शकणार नवती आणि त्यांची संख्या बर्यापैकी होती त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेला सुट्टी दिली होती!!!!!
भोलानाथ ला कधी आर्जव केल्याचं आठवत तरी नाही पण तरी सुट्टी मिळाली!! आम्ही ज्या वेगाने चालत आलो होतो त्याच्या चौपट वेगाने धावत घरी निघालो.....परत उरलेला रोजा बघायला!!

Saturday, 27 February 2016

मराठी

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!!
जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांचा पाउस पडायला लागला आणि कोणितरी मला विचारलं कोणत्या भाषेचा अभिमान प्रमाणभाषेचा की बोलीभाषेचा?
हा प्रश्न कदाचित ज्ञानेश्वरांना देखील पडला असावा जेव्हा त्यांनी संस्क्रुत मधुन प्राकृत भाषेमधे ज्ञानेश्वरी लिहिली,लोकांनी त्यांची हेटाळणी केली असेल तरी त्यांनी मात्र माझ्या मराठीची काय बोलु कौतुके....अमृतातेही पैजा जिंके असं म्हणत मराठी ला सन्मान प्राप्त करुन दिला त्यानंतर कुसुमाग्रज,आरती प्रभु,कवी ग्रेस,महानोर आणि विंदा पाडगांवकरांनी देखील मराठीचा मान वाढवला.....ह्या मधे मराठी बोलीभाषा मात्र जिवंत राहीलीच....प्रांताप्रमाणे भाषा बदलते त्याप्रमाणे वर्हाडी,अहिराणी, आणि महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशाजवळ राहणार्या लोकांची मराठी ह्यांनी देखील आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवुन ठेवलं....लोकांनी ह्या बरोबरच बंबईया मिंदी (मराठी+हिंदी) स्वीकारली तशीच पुण्याची शुद्ध तुपातली मराठी देखील अंगीकारली,
तरीही आज खरी मराठी बोलली जाते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात,
माझा जन्म जरी मुंबई मधे होउन पुण्यात शिक्षण झालं तरी इथल्या मावळी भाषेचे संस्कार आपसुकच माझ्यावरही झाले,वडीलांच्या विदर्भी पार्श्वभुमी मुळे अबे,काबे काय करुन राहिला! या वाक्यांचंही विशेष वाटलं नाही (इतर पुणेकरांना वाटतं तसं)
ट्रेकिंग करायला लागल्यापासुन खरंतर त्या त्या ठिकाणच्या बोलीभाषेबद्दल अजुन जवळीक वाटु लागली,आपण गावकर्यांच्या भाषेत बोललो की आपण त्यांना जास्त जवळचे वाटु लागतो याचा प्रत्यय आला आणि अशुद्ध बोलण्याची लाज न वाटता उलट खुपच मोकळेपणा वाटु लागला......आता सिल्वासाच्या आसपासच्या आदिवासी पाड्यांतुन फ़िरताना त्यांची वारली मराठी ऐकताना वेगळेपण जाणवत नाही, एखाद्या पोराने किंवा पोरीने, "तु काय करतोस?" असं विचारल्यावर राग येत नाही कारण त्यामागची खरी आणि निरागस भावना कळलेली असते....खरतर मराठी काय किंवा कोणतीही भाषा काय,बोलीभाषेच्या जितक्या जवळ तुम्ही जाल तितके त्या समाजाच्या जवळ तुम्ही पोहोचता.
आज कित्येक मराठी कुटुंबांना मराठीतुन बोलण्याची सुद्धा लाज वाटते,त्यांची मुलं आई ला आई न म्हणता मम्मी म्हणतात,आणि मराठी मधे conversation करणे त्यांना घाटी वाटतं तेव्हा त्यांची कीव येते आणि म्हणावसं वाटतं....तुम्ही तुमच्या भाषेचे,तुमच्या लोकांचे होउ शकला नाहीत दुसर्यांचे काय होणार!!आणि मराठी भाषा दिन एका दिवसापुरता न ठेवता ती कायम वापरात ठेवली पाहिजे!इस्त्रीवाल्या भाषेबरोबर आपली बोलीभाषाही तितकीच सन्माननीय आणि साजरी करायला हवी!!

मधुवंती

Sunday, 10 January 2016

गोवा......



गोवा marathon च्या निमित्ताने गोव्याला जायचा योग आला होता,गोवा म्हटलं की समुद्रकिनारे,मद्य आणि मत्स्य अशा गोष्टी लगेच डोळ्यासमोर उभ्या राहतात,
गाडी ने थिविम पार केलं आणि गोव्यात दाखल झाल्याची जाणिव झाली,मडगावला उतरल्यावर मारियोची चित्र नजरेस पडतात, मारियो मिरांडा आणि गोवा वेगळं काढणं शक्य नाही.
पोंद्याकडे निघाले तेव्हा बाहेरचं गोवा न्याहाळत दोन वर्षापुर्वीचं गोवे आठवत होते,तेव्हा उत्तर गोव्याचे सोनेरी समुद्रकिनारे न्याहाळत अनुभवलेले गोवे आणि आता गोव्याच्या वेगळ्या रुपाकडे पाहत मी निघाले होते "पोन्ने गोंय" (old goa) पोंद्याला पोहोचले उद्याच्या रन साठी लागणारी ’बिब’ आणि इतर साहित्य ताब्यात घेउन पेटपुजा करावी असा विचार केला,माझ्या taxi वाल्याने मला cafe bhosale नावाचं एक चांगलं रेस्तरां सुचवलं होतच,मी मांसाहारी असल्याचं सांगितल्यावर त्याने हे होटेल सुचवल्यामुळे मला छान नाश्ता करायला मिळणार म्हणुन मी खुश होते,आणि तिथे पोहोचल्यावर मला कळलं की हे चक्क शुद्ध शाकाहारी होटेल आहे! वाढत्या गुजराती,जैन आजकालच्या प्रचलित भाषेप्रमाणे म्हणायचं तर शेठजी-भटजी!! पर्यटनाचा परिणाम दिसतोय,मनातल्या मनात म्हटलं गोव्यात शाकाहारी जेवण मिळतं की नाही असा विचार करुन धास्तावलेल्या आमच्या सिल्वासा च्या मित्रमंडळाला आता जाउन् सांगायला हरकत नाही खुश्शाल जा गोव्याला,शुद्ध शाकाहारी सुंदर जेवण मिळतं! वत्सा तुजप्रत कल्याण असो!! पु ल देशपांडे स्टाईल!!
पोंदा आणि त्या आजुबाजुची छोटी गावे उद्या बघायला मिळणार होती,याच भागात शांतादुर्गा,मंगेशी इत्यादी प्रसिद्ध मंदिरं आहेत. एका छोट्याश्या होटेलात उतरले आणि उद्याच्या रन साठी लवकर उठायचं म्हणुन लवकरच झोपुन गेले,
२१ किलोमीटर धावणं हा माझाही पहिलाच अनुभव,पुरेशी प्रेक्टीस न झाल्यामुळे खरेतर थोडी द्विधा मनस्थिती होती,या वेळेस माझ्या मदतीला आला माझा रनर्स ग्रुप आणि रनिंग मधला माझा गुरु नितिन,त्याने अक्षरश: मागे लागुन रोज धावायला लावलं,छोट्या छोट्या पण खुप महत्वाच्या टिप्स दिल्या, त्याशिवाय मानसिक तयारी देखील केली,त्यामुळे २१ किलोमीटर काहीही करुन पुर्ण करण्याची नैतीक जवाबदारी माझ्यावर होतीच,मी ठरवलं होतंच की वेळ कितीही लागो मी रन पुर्ण करणारच..... तरीही थोडी घालमेल होतीच!
सकाळी ५.३० वाजता स्टेडियम वर दाखल झाल्यावर थोडे warm up आणि त्यापाठोपाठ झुंबा!! आता सगळेच पुढच्या रन साठी तयार झाले होते स्टेडियम मधुन बाहेर पडुन पोंद्यामधुन बाहेर पडुन थोडंच पुढे गेलो आणि एका वेगळ्या गोव्याचा शोध लागला, दुरभात,तलावली,तोलुलीम,उंदीर आदी गावांमधुन धावणं एक सुखद अनुभव होता,नेहमीच्या प्रसिद्ध मंदिरांखेरीज महालक्ष्मी मंदीर,कपिलेश्वरी मंदीर,आदी प्राचीन मंदिरं दिमाखात उभी होती,छोट्या गावांतुन देखील सम्रुद्धीची लक्षणे नजरेस पडत होती वेगवेगळ्या पद्धतीने आणि रंगांनी सजलेली ती घरं बघणं, शहरातल्या ठोकळ्यांची घरं पाहण्याची सवय असलेल्याला नेत्र सुखद होती,मधेच एखाद्या मंदिरातुन ओमकार किंवा आरती कानात भरुन तिथुन पुढे धाववे तर पुढच्याच कोपर्यावरच्या चर्च मधल्या सांत्र प्रेयर ने वातावरणात एक वेगळी मोहिनी भारली होती,
कोंकणची ती साधी भोळी माणसं आम्हाला बघुन आपापल्या झिलगो किंवा चेडवा
ला "यो बेगिन" म्हणत बघायला बोलवत होते,धावताना आजुबाजुला नारळी,पोफ़ळी ची झाडे,जांभ्याची आणि कौलारु घरं,पायाखाली, बघताक्षणी अंगावर काटा यावा असे विंचु आणि रस्त्याच्या कडेला खुप सगळ्या मांजरी आणि वीजेच्या तारांवर दिसणारे ’किंगु’ वेडे राघु हे आपले नेहमीचे मित्र, सगळं फ़क्त माझ्या डोळ्यांसाठीच होतं...
शेवटचे काही किलोमीटर्स मात्र खरा कस बघणारे होते,कधी येणार पोंदा? हा विचार आणि डोक्यावर वाढलेलं उन.पाय पण आता बोलु लागले होते अखेर पोंदा गावात पोहोचले स्टेडियम वर पोहोचुन मेडल घेतलं,त्यानंतर मात्र आपण खुप दमलोय हे जाणवलं....
आपण रन पुर्ण केली ही भावना अजुन डोक्यात सिंक झालेली नव्हती!कदाचित थकव्यामुळे!
रन संपली होती, पण ह्या निमित्ताने एक वेगळच गोवे बघायला मिळालंय,
खरं गोवा आहे ह्या छोट्या छोट्या गावांत, होंयं,मगें,आश्शें?? अशा उच्चारांत बोलणार्या कोंकणी माणसांत, आणि अस्सल फ़िश करी राईस प्लेट मधे!
त्यामुळे गोव्याला जाल तेव्हा इथल्या रम्य समुद्रकिनार्यांना भेट द्या, वाईन आणि वारुणी दोघांचीही नशा चढु द्या,पण त्याच बरोबर या अस्सल गोव्याला,वाड्यांच्या अल्याड दडलेल्या मंदिरांना भेट द्यायला विसरु नका...इथल्या लाल मातीचा रंग आणि गंध यांचीही नशा चढेल आणि ती उतरता उतरणार नाही.....
बरय तर मग....भेटुया परत.... पुढच्या वर्षी….. देव बोरेम करुम....!!
मधुवंती