Tuesday, 20 November 2018

खाद्य भ्र्मंती



प्रवास म्हटला की वेगवेगळे प्रदेश आले. आणि त्याप्रमाणेच तिथे मिळणारं अन्न, आपल्याकडे भारतात तर विविध प्रकारचं cuisine उपलब्ध आहे,किती प्रकार,चवी,बनवण्याच्या पद्धती पण अंती ते ग्रहण करणार्याचा जठराग्नी शांत करण्याची इच्छा!लहानपणी आई बाबां बरोबर प्रवास करताना प्रवासात जिथे जे मिळेल जसं मिळेल ते खायचं नखरे करायचे नाहित, अशी सवय लागली होती.त्यामुळे सह प्रवाशांसारखं हे आवडत नाही ते आवडत नाही असा प्रश्नच नव्हता,किंवा उत्तरे कडे जाउन मला वरण भात आणि पोळी भाजी खायचेय अशी काही इच्छा व्हायची नाही. माझ्या नवनवीन पदार्थ चाखण्याच्या प्रवासाची सुरुवात तिथुनच झाली असावी असं वाटतं.अलकनंदा राफ़्टिंग नंतर दिल्लीच्या एका आलिशान रिसोर्ट मधे पाहुणचार घेउन एका गरीब बिचार्या ट्रेन मधुन आम्हा मैत्रिणींना परत जायचं होतं, गाडीला pantry असणारच किंवा मधे असलेल्या थांब्यांमधे तरी स्टेशन वर काही मिळेलच.. अशा over confidence मधे दुपारी अगदी फ़ोर कोर्स मील झोडुन संध्याकाळी गाडीत बसलो,जवळ काही म्हणता काही नव्ह्तं आणि गाडीला पैन्ट्री नाही असा शोध लागला.गाडी सुद्धा दिल्ली किंवा नवी दिल्ली अशा नेहमीच्या स्थानकावरुन सुटता सराई रोहिल्ला नावाच्या अगदी गरीब स्टेशन वरुन सुटणार होती. मधल्या थांब्यांवर देखील अक्षरश: काहीही मिळत नव्ह्तं. आमचे सहप्रवासी असलेल्या एका पंजाबी आंटीला आमची अवस्था लक्षात आली असावी. आणि तिने तिचा डबा शेअर करण्याची तयारी दाखवली. पण त्याच वेळेस आमच्या मधे नको तेवढी लाज उत्पन्न झाली होती,बाहेरचं काही आणि कोणा अनोळखी व्यक्ती कडुन काही घेउ नये असले बाळबोध विचार मनात एकवटले, आणि आम्ही नको नको म्हणत ते अन्न नाकारलं, त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागलेच आणि परिणिती उपाशी झोपण्यात झाली. त्यावेळेपासुन जवळ तहान लाडु भुक लाडु घेउन प्रवास करण्याची सवय झाली. आणि समोर आलेलं अन्न नाकारु नये हा धडा देखील मिळाला.

त्यानंतरच मी माझ्या मैत्रिणीबरोबर नेपाळ हुन परत येत असताना काठमांडु ते दिल्ली विमान उशिरा पोचल्यामुळे पुढिल विमान दिल्ली मुंबई देखील उशिरा निघाले,बसलो तेव्हा वाजले होते आणि आता जेवणाचं काय करायचं ह्या विचारात आणि चर्चेत असताना आमच्या पुढील सीट वर बसलेल्या व्यक्तीने आमचं बोलणं ऐकलं असावं आणि त्याने आम्हाला त्याचं तिकिटात समाविष्ट असलेलं जेवण देउ केलं ते त्याला नको होतं म्हणुन. पण गेल्यावेळची चुक आम्ही परत केली नाही आणि त्याची offer स्वीकारली हे वेगळं सांगायला नकोच! अभक्ष भक्षणाचं भय नसल्यामुळे मी सगळे पदार्थ चाखु शकते. जितक्या भक्ती भावाने मी गोल्डन टेंपल मधली पिन्नी (प्रसादाचा शिरा) ग्रहण करु शकते तितकेच कश्मीर मधील वाझवान चाखु शकते,( वाझवान एखाद्या अस्सल काश्मीरी लग्नात किंवा रेस्टोरंट मधे खाणे हा एक सोहळा असतो)केरळ मधे जाउन मला गुजराती थाळी हवी असं म्हणणार्यांतली मी नव्हे आणि जिथे फ़क्त थाळी मिळु शकते तिथे मला कोन्टिनेंटल हवं असा हट्टं मी धरत नाही.हळुहळु नवीन पदार्थ ट्राय करण्याची सुद्धा उत्सुकता निर्माण झाली,धरमशाला ला जाताना एका ढाब्यावर लागलेल्या तन्दुर वर तन्दुरी रोटी शेकणं असो की लेह ला चिम्मी बरोबर मोमो शिकणं आणि तिला उपमा शिकवणं असो ह्यातुन एकमेकांची food cultures आम्ही शेअर केली.तुम्हाला जर authentic regional food चाखायचं असेल तर तुमच्या वाहनाच्या ड्रायवर ला विचारा किंवा गावातल्या लोकांना विचारा केरळ ला असताना मी मासे खाते म्हटल्यावर आमच्या ड्रायव्हर जोजो ने मला एकदम साधं पण चविष्ट करिमीन मासा मिळणारं ठिकाण दाखवलं होतं,त्याचप्रमाणे जुन्या गोव्यात मिळालेली फ़िश थाळी एकदम फ़क्कड होती.

माणुस जितका प्रवास करतो तितका प्रवाही बनतो, सहज बनतो..... वसुधैव कुटुंबकम म्हणजे तरी दुसरं काय असतं....शेवटी पुलंच्या पेस्तन काका मधे पेस्तनजींनी म्हटलंय तसं ," अरे
चालते भाउसाहेब चालते, आपल्याफ़ुडे जे फ़ुड येते ने तेच खा असा बगवान चा विश आहे!" असं समजुन अन्न ग्रहण करायचं असतं नाही ते enjoy करायचं असतं!

मधुवंती
















कश्मिरी वाझवान

नेपाळ मधे ट्रेक दरम्यान खाल्लेलं शेर्पा स्ट्यु