Tuesday, 21 November 2017



टु यु टु सुल्लु!

मै कर सकती है! तुमच्या आजुबाजुला बघा तुम्हाला अशा अनेक सुलु दिसतील ज्यांच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे प्रत्येक गोष्ट हिरीहिरीने करायला त्यांना आवडते,थोड्या कमी शिकलेल्या पण तरी नवीन काम शिकणार्या,कितीही कष्ट पडले तरी ते सोसत काम करणार्या, आणि तरीही हसत हसत वावरणार्या कधी त्यांच्यातल्या गुणांना वाव न मिळालेल्या अशा अनेक सुलुं चं प्रातिनिधित्व करते आपली सुलोचना उर्फ़ सुलु.....
साधा नवरा आणि एक मुलगा आणि साधारण मध्यम वर्गीय कुटुंब या मधे सुलु खरंतर खुष असते,आयुष्याकडुन खरंतर अजुन काही मिळवायची तडफ़ड नाही जे आहे त्यात समाधानी,पण तरीही मी करु शकते असा विश्वास असणारी सुलु....वडील आणि बहिणीं कडुन कमी शिकल्याबद्दल आणि घरी बसुन राहण्याबद्दल कायमच टोमणे ऐकणारी सुलु, एका रेडियो स्टेशनची कोन्टेस्ट जिंकल्याबद्दल बक्षीस घ्यायला गेलेली सुलु येताना आर जे बनण्याचं स्वप्न घेउन येते,त्यामागे सुद्धा नवर्याची बेभरवशाच्या प्रायवेट नोकरीची कटकट कमी करावी असा देखील हेतु असतो,
सुलु आर जे बनते आणि मग मात्र तिच्या आकांक्षांना आभाळ मोकळं होतं,
पण असं काही होतं की ज्याने सुलु परत हादरुन जाते,

चमचा लिंबु शर्यतीत लिंबु कधीही पडु न देणारी सुलु आपल्या घराचा balance कसा ढळु देईल? त्यासाठी मग तिची स्वप्न त्यागायला सुद्धा ती तयार असते,
पण सुलु के पास आयडियाज की कमी नही होती! दोन्ही बाजुंचा तोल सांभाळण्याचं काम करण्यासाठी सुलु ला नवीन कल्पना सुचते आणि मग धम्माल!
ह्या चित्रपटात सर्वात जास्त काही आवडलं असेल तर उगाच स्त्री मुक्ती वगैरे चा न आणलेला आव....सुलु चा फ़ंडा साधा सरळ असतो, चमच्यामधुन लिंबु कधी पडु द्यायचा नाही!
विद्या बालन ने कायमच वेगवेगळ्या भुमिकांमधुन स्वत:ला सिद्ध केलय, या चित्रपटात सुद्धा तिचा प्रसन्न आणि हसतमुख वावर मन जिंकुन जातो कुठलाही स्त्रीमुक्ती वगैरे आव न आणता तिने साकारलेली सुलु बेस्टच,सपोर्टिंग मानव कौल म्हणजेच सुलु चा नवरा अशोक,मुंबईची राणी मलिश्का आणि नेहा धुपिया यांच्या मालिका सुद्धा मस्त!
मध्यंतरा नंतर चित्रपट थोडा रेंगाळतो, समथिंग मिसिंग असं थोडावेळ वाटतं पण ते कदाचित सुरवातीलाच झालेल्या झंझावाती सुरुवातीमुळे असेल.
तुम्हारी सुलु लाईट मुड मधे घेउन जाण्यासाठी नक्कीच पहा!

मधुवंती




नातं

नुकताच एका मागोमाग एक दोन तीन चित्रपट पाहिले एक Hollywood एक Bollywood आणि तिसरा Mollywood! (म्हणजे मराठी चित्रपट) तीघांमधला समान धागा म्हणजे तीन्ही चित्रपट दोन खुप महत्वाच्या नात्यांवर आधारलेले आहेत  आई आणि बाबा,
बापजन्म हा नुकताच रिलीज झालेला सचीन खेडेकर अभिनीत चित्रपट बाप आणि मुलांच्या ताणल्या गेलेल्या नात्यावरचा त्या चित्रपटातला बाप सचीन खेडेकर हा बाबा म्हणुन त्याच्या मुलांशी कधीच चांगला वागलेला नसतो त्याच्या कडे त्याची कारणेही असतात आणि त्याची कल्पना त्यालाही असते...त्यामुळे आपण गेलो तरी आपली मुलं आपल्याला बघायला येणार नाहीत आणि म्हणुन तो एक प्लान करतो, तो बाप म्हणुन असा का असतो आणि मग ते नातं मोकळं करण्यासाठी तो काय करतो ते चित्रपटात बघणं जास्त चांगलं.... दुसरा चित्रपट देखील
नुकताच प्रदर्शित झालेला आणि मुळ अमेरिकन चित्रपट ’शेफ़’चा रीमेक ’शेफ़’ यात सैफ़ अली खान ने मुख्य भुमिका साकारलेली आहे, जेवण बनवणे हा एक व्यवसाय नव्हे तर passion म्हणुन स्वीकारुन आणि प्रसंगी त्यासाठी घरातुन पळुन जाउन या रोशन कालरा ने नाव कमावलेलं असतं पण मुलगा आणि एक्स बायको पासुन दुर असल्यानं मुलाचं आणि त्याचं नातं थोडं तणावाखालीच असतं....आणि मग त्याला एक संधी मिळते ते नातं पुन्हा मोकळं करण्याची आणि त्याचं passion पुन्हा एकदा जगण्याची.... या पुर्ण चित्रपटात केरळ आणि गोवा इतकं मस्त दाखवलय की त्यामुळेच मी तो परत बघु शकते....
तीसरा माझ्या आवडत्या नायिकेचा जुलिया चा चित्रपट Stepmom! १९९८ मधे प्रदर्शित हा चित्रपट
स्टेपमदर म्हणजे सावत्र आई हा शब्द ऐकला की आपल्याला आपण लहानपणी ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीतली त्रासदायक छळवादी सावत्र आई डोळ्यासमोर येते पण जुलिया ने साकारलेली ही आई थोडी वेगळी ठरते....

आपल्या नवर्याची नवीन गर्लफ़्रेंड आपल्या मुलांची आई होण्यासाठी कशी नालायक आहे हे पटवायला कायम तयार असलेली jackie नंतर मात्र आपल्याला असलेल्या दुर्धर आजारात आपण वाचणार नाही याची खात्री पटुन इसाबेल म्हणजेच जुलियाशी एक वेगळं नातं निर्माण करते....तिला आपली मुलं स्वाधीन करताना वेदना होतात पण ती त्यांचा
भुतकाळ असेल तर ही नवीन आई इसाबेल त्यांचं भविष्य बनेल या विचाराने एक अनोखं नातं बनतं दोघींमधे.....
आपल्या कडे असे संघर्ष कायमच बघायला मिळतात पण त्यावरचे चित्रपट मात्र जरा कमीच...
काहीवेळेस रक्ताच्या नात्यांपेक्षा सुद्धा मानलेली नाती खुप उजवी ठरतात...मानसपुत्र किंवा मानसकन्या, मानलेले भाउ बहीण...
नात्यांच्या दुरावत चाललेल्या दुनियेत असे काही चित्रपट दिलासा देतात आणि माणसांमधला ओलावा अजुन आहे हे जाणवुन देतात...तुम्ही असे काही चित्रपट पाहिलेत का? नावे सुचवु शकाल?


Monday, 14 August 2017

थोडा है थोडे की जरुरत है....



काहीच महिन्यांपुर्वी आपल्या पंतप्रधानांनी डिमोनिटायझेशन ची घोषणा केली आणि चलन तुटवड्यामुळे लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या....त्यामुळे झालेले फ़ायदे तोटे आणि त्यावरुन झालेले विनोद सोडले तर त्यामुळे अजुन एक गोष्ट घडली ती म्हणजे लोकं काटकसरी बनली....जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी फ़ळं भाज्या घेण्यासाठी हातात कागदी पैसे असणं जरुरीचं होतं आणि त्यामुळे लोक अवास्तव खर्चाचा विचार करु लागले....अजुन तरी मोठे मेट्रो सिटीज सोडले तर इतर शहरांत आणि गावांत हा व्यवहार रोखीनेच चालतो.ह्यामुळे पैशाची खरी किंमत आणि ते जपुन वापरण्याकडे लोक जागरुक झाले.... एक प्रकारे मिनिमालिस्टिक बनत चालले....
आमची आजी आणि जुनी लोकं सांगायची एके काळी आमच्या
 वेळेला फ़क्त दिवाळीला नवी कापड खरेदी व्हायची वर्षातुन तीन किंवा चार जोड.सणासुदीलाच फ़क्त गोडधोड.....
पुढच्या भावंडाची पुस्तके आणि कपडे मागल्या भावंडांकडुन हसत खेळत वापरले जात... कमीत कमी मधे जास्तीत जास्त समाधानी होती ही माणसं.... पण ग्लोबलायजेशन आलं,जाहिरातींचं युग आलं आणि थोडा ज्यादा मिलेगा! जाहिराती सारखं...माणसं जास्तीत जास्त कसं मिळेल याच्याच मागे लागली....एका गाडीने किंवा एका मोबाईल ने भागे ना! घरातले wordrobes ओसंडुन वाहु लागले पण तरीही माझ्याकडे कपडेच नाहीत अशी अवस्था होउ लागली,चपला जोड्यांची खरेदी प्रत्येक कपड्याला matching होउ लागली (आठवा जयललिताचे भाराभर चपलांचे जोड)
महत्वाकांक्षी होण्याच्या नादात माणसाचा बकासुर झाला....
आजकाल तर आपल्या कडे विशेषत: बायकांमधे खुप असण्याचं वेड भयंकर प्रमाणात आहे,खुप सगळ्या चपला,खुप सगळ्या साड्या (सगळ्याच जणी सुधा मुर्ती होउ शकत नाहीत...दुर्दैव ) काही दिवसातच ड्रेसची fashion outdated! होते. एक घर घेतल्यावर दुसरं घर मग तीसरं,एक गाडी मग दुसरी, तीसरी हा घेण्याचा आकडा वाढतच जातो,आपला मोबाईल खराब झालेला नसतो तो फ़क्त out of fashion कमी features वाला झालेला असतो त्यामुळे तो स्टेटस ला शोभा देणारा वाटत नसल्यामुळे बदलणं अनिवार्य ठरतं या भौतिक गोंधळात एक मिनिमलायजेशन मात्र आपण पाळतोय....ते म्हणजे नात्यांचं!
एका बाजुला असं हे जास्त जास्त म्हणत गोल गोल फ़िरत असणारं जग असताना दुसरीकडे हिमालयात ट्रेक करत असताना खरा मिनिमालिस्टिक अप्रोच कळतो...इथे निसर्गच भरभरुन देतो म्हणुन ओरबाडुन घेण्याची व्रुत्ती नाही कमीत कमी जागेत,प्रतीकुल हवामानात आणि मुख्य म्हणजे आनंदात कसं जगता येइल हे या पहाडी माणसांकडुन शिकावं....
अलिकडेच FYI ह्या English channel वर Tiny House Nation नामक कार्यक्रम बघण्यात आला,
Zack Giffin नामक Rennovation expert लोकांना छोटी घरं बांधुन देतो त्याच बरोबर कमीत कमी सामानात कसं जगायचं ह्याचं समुपदेशनही करतो.... त्यांनी बांधलेली सगळी घरं ५०० स्क्वे.फ़ीट पेक्षा मोठी नसतात! आणि महत्वाचं म्हणजे छोट्या जागेत जास्तीत जास्त कसं बसवता येइल हे देखील दाखवलं जातं
तो कार्यक्रम बघताना लक्षात येतं....किती पसारा आपण आपल्या घरी वाढवुन ठेवलाय, कधीतरी लागेल,वापरलं जाइल, भावनिक गुंतवणुक
स्टेटस अशा अनेक कारणांमुळे आपण अनेक वस्तु जमवुन ठेवतो...
आणि तो आपल्याला कधीच लागत नाही....
शेवटी लियो टोलस्टोय ची कथा How much land does a man need आठवते....
माणसाला जागा लागते तरी किती! पुरण्यापुरती किंवा जाळण्यापुरती!
बरोबरच्या फ़ोटोत दिसतंय ते एवरेस्ट बेस ट्रेकच्या वेळेस वाटेत दिसलेलं छोटं घर,
मोबाईल शिवाय खेळणारं छोटं पोर! (आजकाल दुर्मिळ झालंय! )
 फ़ोर्चेच्या वाटेवर ज्या बाईकडे मी जेवले आणि पैशांच्या ऐवजी सुप पैकेटस दिले,(बार्टर एक्ष्चेंज)





Tuesday, 18 July 2017

निर्मल आनंद     

जुना खुबसुरत बघितलाय? दीना पाठक उर्फ़ निर्मला ची कडक शिस्त आणि त्याला खरतर कंटाळलेली आणि झुगारुन देउ इच्छिणारी तिची मुलं नवरा अशोककुमार उर्फ़ द्वारका प्रसाद....  आणि त्या दरम्यान त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेलं  मंजु नावाचं आनंदाचं कारंज!
ती ह्या सगळ्या दडपलेल्या व्यक्तींना मोकळं व्हायला मदत करते स्वत:ला जे आवडतं ते करायचा प्लान ती आखते, छोटा जगन तिला म्हणतो मंजु दिदी अगर ये मां को पता चल गया तो क्या होगा? त्याला मंजु म्हणते....अरे हम ये उन्हे तकलीफ़ पोहोचाने के लिये थोडीही कर रहे है! हम तो ये सिर्फ़ निर्मल आनंद के लिये कर रहे है!

वुमन लव्ह ट्रैवल नावाच्या एका फ़ेसबुक ग्रुप मधे मी आहे,त्यात काही दिवसांपुर्वी एक पोस्ट होती,एका मुलीने तिच्या वाढदिवसासाठी एका दुसर्या देशाची सफ़र केली पण जाताना विमानात भेटलेले फ़्लाईट अटेंडंट्स प्रवासात मदत केलेली माणसं अशा सगळ्यांसाठी गुडी बैग्ज घेउन त्यांना वाटल्या,त्यांच्या नेहमीच्या आयुष्यात एक छोटं हास्य,एक छोटा आनंद तिने फ़ुलवला तिने ज्या व्यक्तींना ह्या भेटी दिल्या त्या गहिवरुन गेल्या कारण त्यांना अशा भेटी कधी मिळाल्या नव्हत्या किंवा त्यांनी याची अपेक्षा केली नवती....
 आम्ही लहान असताना रोज संध्याकाळी एक आजोबा फ़िरायला निघायचे,आमच्या पैकी कोणालाही ते दिसले तरी, ’अत्तर आजोबा आले!’ असं म्हणत आम्ही त्यांच्या दिशेने धावत सुटायचो आणि त्यांच्या समोर हाताच्या मुठी करुन थांबायचो आणि हे अत्तर आजोबा आमच्या हाताला त्यांच्या जवळचं अत्तर लावायचे! लहान मुले तर होतीच पण मोठी माणसं सुद्धा न संकोचता त्यांच्या कडुन अत्तर लावुन घेत असत! आज आजोबा नसले तरी त्यांची आठवण त्या अत्तरामुळे ताजी तवानी आहे.
माझे आजोबा कै.भास्कर कर्वे ह्यांना सुद्धा फ़ुगेवाले आजोबा म्हणुन ओळखत ते कुठेही गेले आणि त्या घरात लहान मुलं असली की त्यांच्या खिशातुन फ़ुगे निघत आणि ते फ़ुगवुन त्या मुलाच्या हातात दिले की त्या पोराच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा असे! त्यामुळेच फ़ुगेवाले आजोबा त्यांना हवे हवेसे वाटत.
गेल्या वर्षी लेह लडाख ची रोड सफ़ारी केली,आमची टुर श्रीनगर पासुन सुरु होणार होती पण त्याआधी लुधियाना पासुन मी चड्ढा नावाच्या एका कुटुंबासोबत श्रीनगर पर्यंत पोहोचणार होते,वाटेत आम्हाला भेटणारे लोक,कश्मीर मधे रस्त्यांवर किंवा चौक्यांवर उभे असलेले सैनिक यांना आम्ही आमच्या कडच्या गोड गोळ्या देत होतो,अट फ़क्त एक होती त्या व्यक्ती ने किमान हसायला पाहिजे! अशा प्रकाराने त्या दोन दिवसात किती लोकांच्या चेहर्यावर हसु फ़ुललं असेल कोण जाणे,रस्त्यावर उन थंडी पावसाची पर्वा न करता उभ्या असलेल्यासैनिकांसाठी  एक छोटासा हसरा क्षण मात्र निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो!

गेले बरेच वर्षांपासुन माझी एक मैत्रीण काही गावांमधे दिवाळीचा खाउ,कपडे आणि अभ्यासाचं सामान घेउन जात असते,त्यासाठी कितीही कष्ट पडले तरीही ते हसतमुखाने करत असते

असे अनेक साधे पण क्षणीक हसु आणणारे क्षण आपणा सर्वांच्याच आयुष्यात येत असतील, कामाचा ताण, काळज्या दु:ख नेहमीचीच आहे हो पण असा एखादा क्षण आपल्याला कोणासाठी निर्माण करता आला तर आपल्याही चेहर्यावर समाधानाचं हसु येउ शकतं.
दर वेळेस काहीतरी मोठ्ठं आणि फ़ोटोजेनिकच करायला हवं असं नाही पण ह्या छोटया छोट्या गोष्टी कायमच्या आठवणी कोरुन जात असतात!
शेवटी विंदां च्या कवितेच्या दोन ओळी ज्यांचा अर्थ जरा उशीराच समजला.....
देणार्याने देत रहावे घेणार्याने घेत रहावे घेणार्याने घेता घेता देणार्याचे हात घ्यावे!

मधुवंती


Sunday, 25 June 2017

सनबर्न!





सनबर्न म्हणजे रे काय भाउ?
गवताच्या गंजीवर गवत चघळत पडलेल्या बब्याला पिंट्याने प्रश्न विचारला.
बब्या थोडासा दचकलाच! ह्ये प्रकरन त्याच्यापर्यंत जाउन कसं पोचलं कळंना! गावाच्या वेशीवर होणारा हा कार्यक्रम त्याच्या ऐकीवात होताच!
आरं तुला कस्काय माहित?
पिंट्या: अरे ते च्यानल वाले बोंबलत व्हते नव्हं सनबर्न सनबर्न....मला वाटले ते परदेशी पोट्टया येतात नाई ट्यानिंग का काय ते करुन घ्याया
बब्या: ह्या ह्या ह्या ते सनबर्न नव्हं,आरं तो एक कार्यक्रम हाय त्या ईंग्रजांनी आनलेला! गाण्याचा म्युजिक शो म्हनं...
पिंट्या: अच्छा म्हणजे सवाई असतो तस्सा!?
बब्या: आरं न्हाई रं,त्यो आपली संस्क्रुती जपनारा कार्यक्रम आहे आनि हा निस्ताच धांगड्धिंगा!
पिंट्या: म्हंजी गनपती मधी आपन करतो तस्सा?
बब्या: आरं ती गनपती ची वरात असती! देवाची.....
आता कसं समजावुन सांगु तुला सनबर्न म्हणजे जिथे दारु आणि नाच गाणं चालतंय,
पिंट्या: म्हंजी आपन गणपतीच्या मिरवणुकीत करतो तस्सं??
बब्या: न्हाई न्हाई ! आपण तर मिरवणुक काढतो,ढोल ताशाच्या गजरात आपली संस्क्रुती हाय तशी! ह्यांचं म्हण्जे काहीतरी भलतीच गाणी लावुन त्यावर आचरट नाच चाललेला असतोय....
पिंट्या: हाहा म्हनजे आपन मिरवनुकीत करतोय तसा नागिन डांन्स?
बब्या: आरं ते आपल्या संस्क्रुती परमानं आपन करतो,ते तर तिथे दारु विकत्यात!
पिंट्या: ते तर आपणही करतो की दारुची पार्टी!नवीन वर्षाच्या दिवशी गडावर!
बब्या: आरं हाळु बोल! आपन आपल्या आनंदासाठी करतो.... आन ते पन आपली संस्क्रुती जपुन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी! पन ते रग्गड पैसा कमावतात
पिंट्या: आरं म्हनजी तर आपन करतोय तसच की! समदी वर्गणी कुठं जाते ह्या कामात,आन आपलं सामाजिक मंडळ दुसरं काम तरी कुठं काय करतं? सण संपला की मंडळ गायब!
बब्या: आरं अवघडच हाय बाबा आता कसं सांगु! आपलं जे काही चाल्तं ते परंपरेला जपन्यासाठी आनि ते जे काय करतात ते आपल्या संस्क्रुती चा नायनाट करण्यासाठी!
पिंट्या: अस्संय होय! मला तर वाटलं व्हतं तुला लई आवडेल हे सनबर्न! म्हुन तर दोन पास पन घेतलेत!पन नसल यायचं तर राह्यलं बापा! बघतो मी कोनी दुसरं मिळतं का!
बब्या: अरे! तुझ्याकडं पास हाय व्हय मंग असं सांग ना भाउ,येडा झाला का मला सोडुन जायला! चल जाउन बघुन तर येउ काय अस्तंय सनबर्न!
मधुवंती गोडसे
disclaimer: author does not support sunburn or any such so called festivals nor against it!! https://www.facebook.com/images/emoji.php/v7/f4c/1/16/1f642.png:)