Wednesday, 26 May 2021

दरी

 

तुझ्या माझ्यात होती..एक अदृश्य दरी

एक अदृश्य दरी....

कशी आहेस ग? काय म्हणतेस... कोरडा प्रश्न मी विचारला तर खरी

पण माहीत होतं आटलेला झरा आता फिरून येणार नाही माघारी

तु किंचित कसनुसून उत्तरली होतीस .... मी? बरी....

माहीत होतं, आहे आपल्यात एक अदृश्य दरी

क्षणात आठवली आयुष्याची ती पानं सारी

आपली ओळख झाल्या पासुनच्या आपल्या मैत्रीच्या नाना परी

भासली होतीस तेव्हा तु एक अनोखी परी

आज फिकुटलेली वाटलीस तरी विचारलं नाही कारण,कारण माहीत होतं पडली आहे आपल्यात एक अदृश्य दरी

तुझं नाव, तुझा ठाव, वेगळीच होती तुझी दुनियादारी

तुझ्या बाबतीत जाणून घेतलं मी सुद्धा परोपरी

एकदा आठवतंय येऊन ठाकले तुझ्या दारी

पण तो उंबरा खूपच उंच होता जाणिव करुन देणारा...

की आहे आपल्यात एक अदृश्य दरी

तुझा संसार सजला,गेलीस तु भरल्या घरी

मैत्री आपली माझ्या मनात कायमच होती अजुन तरी

तरीही जाणवत होतीच मला एक अदृश्य दरी

मध्यंतरी कानावर आले होते कोणाकडून तरी

राजाच्या राणी सारखी वावरतेस तु तुझ्या घरी

कोण कुठली मैत्रीण आठवणार कशी तुला तरी?

मला तुझ्या घरच्या पोकळ वाश्यांची कुणकुण लागली होती जरी...

तरीही धजले नाहीच मी बोलायला कारण...ती अदृश्य दरी

आज फारच वर्षानी भेटलीस बघ...

खोटीच दिसत होतीस का खरी?

मलुलले डोळे तेज दिसतच नव्हत चेहर्या वरी

उसन अवसान आणून म्हणालीस कशी आहेस ये न कधी माझ्या घरी

मी अगदी मनापासून बोलल्या सारखी म्हणाले मी झकास आहे येईन कधी तरी

तुझ्या चेहऱ्यावर झाकोळून आलेला अंधार दिसला होता मला

चिंता करू नकोस ग

आठवते आहे मला आपल्यातली अदृश्य दरी!

मधु

Tuesday, 25 May 2021

महिषासुरमर्दिनी

 कैक जन्म आधी असं म्हणतात

तु जन्म घेतला होतास

महिषासुर राक्षसाचा तु

वध म्हणे केला होतास

शृंगार रुप सोडून रौद्र धारण केला होतास

आणि देवांनाही जमलं नाही तो खेळ तु खेळला होतास

जसं तुझं वाहन तशीच हिम्मत तुझी होती

सृष्टीची तारणहार अशी ओळख तुझी होती

तु होतीस पुत्री,भगिनी,माता देखील कोणाची

कोणासाठी जन्मदात्री तर काळ कोणासाठी होतीस

वधानंतर महादेवांनी शांतावल होतं तुला

कुंडात रुप बघुन तु सावरलं होतंस स्वतः ला

पुन्हा दुर्गेची गौरी झाली होतीस

शांतता संयम यांची राज्ञी तु झाली होतीस

आज गरज आहे माते तु पुन्हा दुर्गा बनण्याची

गौरी रुप सोडून पुन्हा रौद्ररूप धरण्याची

आज असुर देखील पूर्वीपेक्षा मोठे आहेत

देवाच्या देखील रुपात बसलेले दिसतील ते खोटे आहेत

संयम शांतता सोडून माते गरज आहे आता उठण्याची

स्वतः च्या शीलासाठी स्वतः च लढण्याची

आज प्रत्येक घराघरात तु जन्म घ्यायला हवास

महिषासुराचा वध हा कानमंत्र तु द्यायला हवास

शांत करायला तुला महादेव धावणार नाहीत

कारण सध्या महिषासुरांची संख्या त्यांना झेपणार नाही

आज तुझी गरज आहे माते पण नाही फक्त तुझ्या एकटीची

तुझ्या सारख्या हजारो व्हाव्यात निर्माण,

गरज आहे त्या शक्तीची.

मधु
१७/१०/२०२०
May be an image of 1 person




वारूळ

 


तुम्ही कधी वारूळ बघितलं आहे?
भुसभुशीत मातीत बनलेलं...
कधी एखाद्या झाडाच्या आधारावर बनलेलं किंवा
एखाद्या दगडाच्या साथीला उभं राहिलेलं?
छोट्या छोट्या मुंग्यांनी बांधलेलं,
कष्टकरी कामकरी...
हळूहळू ज्या मुंग्या धान्य जमवत जातात..
वर्षांनुवर्षे ह्यांचे मजलेही चढत जातात
ह्यांच्या घराला नसतो पोकळ भपका
उंच चढलेला डोलारा नसतो कुजका
नाती गोती राजकारण ह्यावर नसतो त्याचा पाया
म्हणूनच तर न डगमगता उभा असतो डोलारा
वारूळ तसं फार कोणाच्या अध्यात मध्यात नसतं
सहसा कोणाचा पाय पडेल अशा जागी नसतं
मुंग्या करतात स्वतः पूर्ण प्रयत्न
कोणाला त्रास न देण्याचा यत्न
कधी जर तुम्ही वारूळ मोडलंच
आणि त्यांचं कष्टाळू घर तोडलंच
तर मात्र मुंग्या दयामाया करत नाहीत
पिसाटल्या सारखी होते तुमची अवस्था
करता मात्र तुम्हाला काहीच येत नाही
म्हणूनच मुंग्यांचं वारूळ कधीही तोडू नाही
मधुवंती गोडसे

अभी तो मै जवान हुं!


May be an image of Madhuvanti Godse and long hair




 नुकतीच पार केलेली चाळिशी.. अन् उणापूरा एक पांढरा केस...

करून द्यायला लागला जाणीव..बाई तुम्ही ओलांडली वयाची वेस...

आता जरा हळू चालत जा.. ढालगजपणा जरा बंदच करा..

जोरजोरात हसणं थांबवत चला आणि वयाला साजेल असं वागत चला

क्षणभरच तिने विचार केला... केसा प्रमाणे पांढुरलं तर नाही माझं मन

अजुन तरी चांगली साथ देत आहे धावपळीत माझं तन

सुरकुत्या जरी दिसतात तरी अजुन रसरशीत पणा जिवंत आहे

आणि खळखळून हसण्याची उमेद माझ्यात अजुन ज्वलंत आहे

क्षणात झटकून टाकली केस केसाची,अन् दटावून आज्ञा केली गप्प बसण्याची

तुझा बदलला असेल रंग, पण... काळीज अजुन रुमान आहे

अन् एज इज जस्ट अ नंबर अजुन तर मी जवान आहे
😉
मधुवंती





आयुष्य

 जुनी आठवण... वर्ष 1997, कुवारी पास ट्रेक. ह्या दोघींनी हट्टाने फोटो काढून घेतला होता माझ्याबरोबर.

माझ्या खांद्यावर हात टाकून बसलेली ती खूप गोड होती दिसायला... अक्षरशः सफरचंदी रंगाचे गाल... तिचा पत्ता पाठवला होता तिने..मला फोटो पाठव म्हणून...आणि मी सुद्धा एक कॉपी पाठवली होती.
आता कुठे असेल ती?
सगळ्यांची आयुष्य बदलतात... I have come a long way.. ती चं पण आयुष्य बदललं असेल.. आता आम्ही कधी भेटू का? माहीत नाही.. आणि भेटलो तरी ओळखू का? तेही माहीत नाही...
आयुष्य हे असच असतं...
खूपशी माणसं या ना त्या कारणाने गमावतो आपण.. कोरोना मध्ये खूप गमावली...
एकच वाटतं की, जेव्हा शक्य असेल तेव्हा माणसांना भेटा, त्यांच्याशी बोला... माहीत नाही परत कधी ती भेटतील की नाही.......

May be an image of 3 people, including Madhuvanti Godse, people sitting, people standing, tree and outdoorsnd 205 others



दृष्टिकोन

 

एका समर कॅम्प वर होते instructor म्हणून.आठ ते चौदा वयोगटातील मुलं मुली.. त्यांच्यात एक मुलगा होता. मायोपिया होता त्याला... म्हणजे दूरची दृष्टी नाही... त्याच्यासाठी स्पेशल instructions होत्या दोन फुटांच्या पलीकडे त्याला काही दिसत नसे.. त्याला जपायच तर होतंच पण त्याच वेळी त्याला ही जाणीव देखील होऊ द्यायची नव्हती की त्याच्या कडे जरा जास्त लक्ष दिलं जातंय..

Rock climbing session होतं... मुलं घाबरत होती.खाली बघून त्यांना आपण पडू की काय अशी भीती वाटत होती. आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊन प्रसंगी थोडा सपोर्ट देऊन त्यांच्याकडून करून घेत होतो. आमचा हा छोटा स्टार मात्र बिनधास्त harness बांधून घेऊन तयार झाला. आणि पहिल्या होल्ड वर हात बसवून सपासप वर गेला...
कारण काय असेल विचार करा? त्याला दोन फुटांच्या खालचं काही दिसतच नव्हत मग खाली बघून भीती वाटणं दूरच राहिलं... जे काही आहे ते समोर दिसतंय ते आणि तेवढंच...असाच दृष्टिकोन आपण आयुष्यात ठेवला तर किती छान न... मागच्या गोष्टींनी कुढायला नको आणि भविष्याचा विचार करून घाबरायला नको
काय वाटतं?
मधुवंती

रणवीर ब्रार



 "जेवण झालं का?"... एकच व्यक्ती असा आहे जो बिनदिक्कत हा प्रश्न विचारू शकतो आणि बायकांना अजिबात राग येत नाही.. कारण तो फक्त तेवढं विचारून थांबत नाही तर तो म्हणतो, "चलो मै सिखाता हु खाना बनाना!" आणि गालातल्या गालात हसतो! इतक्या handsome माणसाकडून स्वैपाक शिकायला कोणाला नाही आवडणार?

तो hot sensation आहे रणवीर ब्रार... ❤️
पंजाबी मुलगा जो आता आमची मुंबई मध्ये मराठी मुलगी बरोबर लग्न करून स्थाईक झालाय.. तो फक्त गोड दिसतो म्हणून नाही, तर त्याच्या अन्य गुणांसाठी पण जाम आवडतो.
ह्याच्याशी नक्की ओळख कधी झाली आठवत नाही पण कुठेतरी यूट्यूब वर एखादी रेसिपी बघून झाली असणार! आणि नंतर मात्र तो किचन मध्ये घुसला तो कायमचाच! जोश टॉक मध्ये मग त्याच्या आतापर्यंत च्या struggle ची गोष्ट ऐकली. अर्थात त्याच्या बद्दल ची माहिती आणि त्याचं जोश टॉक तर तुम्हाला इंटरनेट वर लगेच मिळेल...
रणवीर जेव्हा एखादी रेसिपी शिकवतो न तेव्हा त्या पदार्थाचं मूळ कुठे आहे,त्या पदार्थाला हे नाव कसं पडलं असेल आणि त्या पदार्थाच्या आजूबाजूला गुंफलेल्या कहाण्या सांगत असतो.त्यामुळे ह्याच्याकडून एखादा पदार्थ शिकताना हाताशी भरपूर वेळ ठेवा,कारण पहिल्यांदा तुम्ही फक्त रणवीर ला आणि त्याच्या बोलण्याकडे बघत राहता. बोलता बोलता तो कधी ingredients mix करतो ते कळत नाही...आणि बरं एक टेबलस्पून हे टाका ते टाका असं तो फार कमी सांगतो... फार फारतर, " नमक श्रद्धा अनुसार!"
एकी कडे त्याचं बोलणं सुरु असतं आणि एकीकडे रेसिपी आकार घेत असते.त्यामुळे कमीत कमी दोन वेळा vdo बघायची तयारी ठेवा.
गेल्या वर्षीच्या लॉक डाऊन मध्ये ह्याचे vdo बघितले गेले सर्वात जास्त वेळा! तो घरूनच सर्वांसाठी काही ना काही बनवत असे... कित्येकदा आपल्या घरातल्या लोकांना त्यात सामील करून घेत असे... एकदा तर त्याने त्याचे वडील, 'बाबूजी स्पेशल चहा' त्यांच्या समोर त्यांचं मार्गदर्शन घेऊन करून दाखवला होता. त्याच्या बोलण्यात,विशेषत: traditional रेसिपीज दाखवताना त्याच्या 'बीजी' म्हणजे आजीचे संदर्भ वारंवार येतात.रणवीर त्याच्या जेवण बनवण्याबरोबर त्या त्या ठिकाणची संस्कृती जोडतो.नवीन ट्रेंड्स आले की त्यात खरंच तथ्य आहे का की लिक्वीड पराठा सारखं ते पण रबरी चामट झालं आहे हे सांगायला तो घाबरत नाही.काही स्पेशल टिप्स आणि ट्रिक्स सांगाव्यात तर फक्त त्यानी आणि मग हळूच त्याचा तो फेमस डायलॉग, "आप कहोगे रणवीर आपने बताया नही! तो रणवीर ने बताया था!"
कडा प्रशाद बनवताना तुपात कंजुषी करायची नाही.
खाताना कॅलरीज कधी मोजयच्या नाहीत. हे त्याच्याकडून शिकलेल्या काही गोष्टी.
लॉक डाऊन मध्ये कसलाही गहजब न करता, जे तुमच्या घरी आहे त्यातूनच बनवा हे सांगायला तो विसरला नाही आणि त्याच्या रेसिपीज flexible बनल्या.
गणेशोत्सव च्या दरम्यान त्याने त्यांच्या घरी कायम मोदक घेऊन येणाऱ्या सेजल ना त्याच्या चॅनल वर बोलावलं होतं.मराठी सेजल ला अतिशय comfortable करून तुम्ही मराठीत बोला माझी आज मराठी ची परीक्षा आहे, असं म्हणून नवऱ्याच्या मृत्यू नंतर मिटून गेलेल्या सेजल ला परत एकदा बोलतं केलं.त्यांच्याकडून शिकून सगळ्यांना उकडीचे मोदक बनवायला शिकवलं. त्याचं हे साधं वागणं खरोखर भिडून जातं!
इतर chef बरोबर तुलना करणं बरोबर नाही पण रणवीर जितका त्याच्या viewers बरोबर कनेक्ट होतो तितकं क्वचितच कोणी होत असेल.
असा हा रणवीर साधासुधा पण तरीही गोड.. त्याच्यासाठी फक्त एकच प्रश्न, इतने क्यूट दिखने की रेसिपी क्या है? रणवीर आप ने बताया नहीं! 😉
मधुवंती
May be an image of 1 person, beard and indoor