निर्मल आनंद
जुना खुबसुरत बघितलाय? दीना पाठक उर्फ़ निर्मला ची कडक शिस्त आणि
त्याला खरतर कंटाळलेली आणि झुगारुन देउ इच्छिणारी तिची मुलं नवरा अशोककुमार उर्फ़ द्वारका प्रसाद.... आणि त्या दरम्यान त्यांच्या सगळ्यांच्या
आयुष्यात आलेलं मंजु नावाचं आनंदाचं
कारंज!
ती ह्या सगळ्या दडपलेल्या व्यक्तींना मोकळं व्हायला मदत करते स्वत:ला जे आवडतं
ते करायचा प्लान ती आखते, छोटा जगन तिला म्हणतो मंजु दिदी अगर ये मां
को पता चल गया तो क्या होगा? त्याला मंजु म्हणते....अरे हम
ये उन्हे तकलीफ़ पोहोचाने के लिये थोडीही कर रहे है! हम तो ये सिर्फ़ निर्मल आनंद के
लिये कर रहे है!
वुमन लव्ह ट्रैवल नावाच्या एका फ़ेसबुक ग्रुप मधे मी आहे,त्यात काही दिवसांपुर्वी एक पोस्ट होती,एका
मुलीने तिच्या वाढदिवसासाठी एका दुसर्या देशाची सफ़र केली पण जाताना विमानात
भेटलेले फ़्लाईट अटेंडंट्स प्रवासात मदत केलेली माणसं अशा सगळ्यांसाठी गुडी बैग्ज
घेउन त्यांना वाटल्या,त्यांच्या नेहमीच्या आयुष्यात एक छोटं
हास्य,एक छोटा आनंद तिने फ़ुलवला तिने ज्या व्यक्तींना ह्या
भेटी दिल्या त्या गहिवरुन गेल्या कारण त्यांना अशा भेटी कधी मिळाल्या नव्हत्या
किंवा त्यांनी याची अपेक्षा केली नवती....
आम्ही लहान असताना रोज संध्याकाळी एक
आजोबा फ़िरायला निघायचे,आमच्या पैकी कोणालाही ते दिसले तरी, ’अत्तर आजोबा आले!’ असं म्हणत आम्ही त्यांच्या दिशेने धावत सुटायचो आणि
त्यांच्या समोर हाताच्या मुठी करुन थांबायचो आणि हे अत्तर आजोबा आमच्या हाताला
त्यांच्या जवळचं अत्तर लावायचे! लहान मुले तर होतीच पण मोठी माणसं सुद्धा न
संकोचता त्यांच्या कडुन अत्तर लावुन घेत असत! आज आजोबा नसले तरी त्यांची आठवण त्या
अत्तरामुळे ताजी तवानी आहे.
माझे आजोबा कै.भास्कर कर्वे ह्यांना सुद्धा फ़ुगेवाले आजोबा म्हणुन ओळखत ते
कुठेही गेले आणि त्या घरात लहान मुलं असली की त्यांच्या खिशातुन फ़ुगे निघत आणि ते
फ़ुगवुन त्या मुलाच्या हातात दिले की त्या पोराच्या चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा
असे! त्यामुळेच फ़ुगेवाले आजोबा त्यांना हवे हवेसे वाटत.
गेल्या वर्षी लेह लडाख ची रोड सफ़ारी केली,आमची
टुर श्रीनगर पासुन सुरु होणार होती पण त्याआधी लुधियाना पासुन मी चड्ढा नावाच्या
एका कुटुंबासोबत श्रीनगर पर्यंत पोहोचणार होते,वाटेत आम्हाला
भेटणारे लोक,कश्मीर मधे रस्त्यांवर किंवा चौक्यांवर उभे
असलेले सैनिक यांना आम्ही आमच्या कडच्या गोड गोळ्या देत होतो,अट फ़क्त एक होती त्या व्यक्ती ने किमान हसायला पाहिजे! अशा प्रकाराने त्या
दोन दिवसात किती लोकांच्या चेहर्यावर हसु फ़ुललं असेल कोण जाणे,रस्त्यावर उन थंडी पावसाची पर्वा न करता उभ्या असलेल्यासैनिकांसाठी एक छोटासा हसरा क्षण मात्र निर्माण करण्यात
आम्ही यशस्वी झालो!
गेले बरेच वर्षांपासुन माझी एक मैत्रीण काही गावांमधे दिवाळीचा खाउ,कपडे आणि अभ्यासाचं सामान घेउन जात असते,त्यासाठी
कितीही कष्ट पडले तरीही ते हसतमुखाने करत असते
असे अनेक साधे पण क्षणीक हसु आणणारे क्षण आपणा सर्वांच्याच आयुष्यात येत असतील, कामाचा ताण, काळज्या दु:ख नेहमीचीच आहे
हो पण असा एखादा क्षण आपल्याला कोणासाठी निर्माण करता आला तर आपल्याही चेहर्यावर
समाधानाचं हसु येउ शकतं.
दर वेळेस काहीतरी मोठ्ठं आणि फ़ोटोजेनिकच करायला हवं असं नाही पण ह्या छोटया
छोट्या गोष्टी कायमच्या आठवणी कोरुन जात असतात!
शेवटी विंदां च्या कवितेच्या दोन ओळी ज्यांचा अर्थ जरा उशीराच समजला.....
देणार्याने देत रहावे घेणार्याने घेत रहावे घेणार्याने घेता
घेता देणार्याचे हात घ्यावे!
मधुवंती