मी पहिल्यांदा चहा कधी प्यायले होते हे मला आठवणार नाही हे नक्की कारण आमच्या
घराण्यात लहान बाळाचं उष्टावण चहा पाजवुन करायची पद्धत आहे!त्यामुळे आमचा एक
प्रकारे बाप्तिस्मा झाल्याप्रमाणे चहा चाटवण्याची रित होती.आता ज्या बालकाने
उष्टावणातच चहा प्यायला असेल त्याच्याकडुन तुम्ही काय अपेक्षा करणार!
तर अशा प्रकारे चहा ची सुरुवात तर झाली पण नंतर रोज मुकाट्याने मग भरुन दुध
प्यायला लागायचं,चहा प्यायल्याने माणुस काळा होतो! असा एक
समज भरवला गेला होता(ही अंधश्रद्धा आहे हे ज्यांनी मला बघितलं आहे त्यांना कळेल)
त्यामुळे चहा नाहीच,पण महिन्यातुन एकदा होणार्या एरंडेल
पिण्याच्या समारंभानंतर चहा प्यायला मिळे त्यांमुळे ते एरंडेल पिणं थोडं सुसह्य
होई.
मात्र कोलेज मधे पाउल टाकल्यावर सर्वांप्रमाणे आम्हालाही पिसं आली होती
त्यामुळे चहा वडा पाव हे रोजचं समिकरण बनलं होतं,नमोंच्या चाय पे चर्चा च्या आधी आम्ही चाय आणि वडा पाव पे चर्चा करायचो,त्या काळी दिवसाला एखाद्या दारुड्या सारखे आम्ही आठ आठ कप चहा प्यायचो.
प्रवासात तर चहा म्हणजे संजीवनीच,कुल्हड
वाली चाय पिउन उरलेले कुल्ह्ड परत घरी घेउन यायचे,धरमशाला
च्या ट्रेक ला ट्रेन ने जाताना ्मध्यरात्री एका स्टेशन वर जाग आली,तेव्हा चहा घेणार का ह्या प्रश्नाला मी कसलाही विचार न करता बिन्धास्त हो
म्हणुन टाकलं.
पण ट्रेन मधेच मिळणारा डीप डीप वाला चहा मात्र कधीच आवडला
नाही.चहा म्हणजे कसा वाफ़ेमधेच मसाल्याचा सुगंध येउन तरतरी आणणारा असला पाहिजे!
त्यानंतर कित्येक निरनिराळे चहा चाखायची आणि बनवायची वेळ
आली.
कोरीगड ट्रेक मधे ३० जणांच्या ग्रुप साठी चहा बनवायची
जवाबदारी माझ्यावर आली होती,तेव्हा
इतक्या जणांसाठी चहा करताना प्रमाण असं कपाने घ्यायचं नसतं हे कळलं आणि त्यामुळे
अंदाजे साखर चहा पावडर घालुन चहा केल्यावर आमच्या एका दादा कडुन सासरा साखर
कारखाना वाला का ग तुझा! असा शेरा मिळाला होता! नशीब न! खरं नाही झालं त्याचं
बोलणं!
तर कोलेज डेज च्या अखेर पर्यंत मी सर्टिफ़ाईड चहांबाज बनले होते!तेव्हा coffee
फ़क्त दक्षिणेत प्रसिद्ध होती आणि cafe coffee day फ़ारच नवीन होतं त्यामुळे lot can
hppen over a coffee अशी शक्यता जवळ जवळ नव्हतीच.......चहा कसा असा
सर्वसामान्यांचं पेय आहे.
आता प्रवासांमधे बरेच वेगवेगळे चहा चाखायला मिळालेत...अगदी पन्हाळ्याच्या
पायथ्याच्या धनगर वाडीत बकरीचं दुध घातलेला चहा किंवा वेल प्रोसेस्ड दार्जिंलिंग टी...लेह
मधला बटर टी किंवा कश्मीर मधला काहवा.
नेपाळ मधे ट्रेक करताना प्यायलेला लेमन टी.माझ्या इंग्लंडच्या मित्राने खास
माझ्यासाठी तिथुन आणलेला ब्लुबेरी आणि जस्मिन टी....केरळ मधे प्यायलेला वैनिला टी
की मग गुजरात मधे प्रसिद्ध असलेला पुदिना नी चाय कुठे
ते आठवत नाही पण खडी चम्मच चाय....त्यात इतकी साखर असते की त्यात चमचा खोचुन उभा
करता येतो
ह्या प्रत्येक चहा चा कैफ़ वेगवेगळा पण एक गोष्ट मात्र लक्षात येते की ते
वेगळ्या प्रकारचे चहा हे फ़क्त त्या ठिकाणीच छान लागतात....काहवा कश्मीर च्या
बर्फ़िल्या ठंड मौसम मधे बेस्ट तर बटर टी एखाद्या मोनेस्ट्री मधे बसुन घेतला
तर....लेमन टी ट्रेक मधे तरतरी आणण्यासाठी....
शेवटी प्रवासात तुम्हाला कितीही आरामशीर पलंगांवर झोपायला मिळालं तरी घरी
आल्यावर त्या आपल्या नेहमीच्या सवयीच्या गादी उशीवर बेष्ट झोप लागते की नाही तसं
मला आपला आलं आणि वेलची घातलेला चहा जवळचा वाटतो! अर्थात खुपच मुड असला की मी त्या
उकळत्या पाण्यात आलं,वेलची,पुदिना,गवती चहा,दालचिनी,,मिरपुड,लवंग जमलच तर
पारिजातकाची पानं असं घालुन साग्रसंगीत चहा बनवते....
आता मात्र वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी नामक चहा घ्यावा
लागतोय,पण अर्थात मसाला चाय ची मजाच निराळी...
असो तर हे चहा पुराण आजच्या दिवशी करण्याचं कारण आज जागतीक चहा दिवस आहे!
चाय़ पियो मस्त जियो!
मधुवंती गोडसे
फोटोत दिसतो आहे तो लेमन टी बेस कॅम्प ट्रेक वर... अमा दाबलाम च्या बॅकग्राऊंड वर
No comments:
Post a Comment