जामनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या लाखोटा लेक पाशी सगळी संध्याकाळ घालवली
होती आणि आता परत जायचं म्हणुन वळणार तितक्यात आकाशात काही काळसर दिसलं,वर
बघितल्यावर दिसलं रुस्टिंग.... स्टार्लिंग ह्या छोट्या पक्ष्याचं रुस्टिंग....
रुस्टिंग म्हणजे संध्याकाळच्या वेळी एखाद्या झाडावर आश्रय
घेणं....त्या वेळी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करतात हे पक्षी...हे छोट्या आकाराचे पक्षी एका वेळी
समुहात आणि विविध आकार करुन निरनिराळ्या आकारात आकाशात
चकरा मारतात...हळुहळु त्यांची संख्या सुद्धा वाढत गेलेली दिसते आणि असं वाटतं जणु
कोणी महाकाय पक्षी आकाशात आहे.....हा नजारा बघणं केवळ अप्रतिम अनुभव असतो.....
हे करण्याच कारण काय? जे शक्ती प्रदर्शन करताना माणसाचं
असतं तेच! आपण किती मोठे आहोत म्हणजेच आमच्यावर हल्ला करु नका असा मोठ्या शिकारी
पक्षांना दिलेला इशाराच म्हणा ना!
त्यावरुन आठवलं.....मध्यंतरी एक व्हिडिओ फ़िरत होता,कोणत्यातरी देवस्थानाभोवती हे पक्षी त्या देवाच्या आरतीच्या
वेळी तालात अशा हालचाली करतानाचा....तर त्यांच्या श्रद्धेचा मान ठेवुन असं नम्रपणे
नमुद करावसं वाटतं की ते तसं काही नाही त्यांच्या त्या घिरट्या मारण्याला
कुठल्याही संगीताची जोड दिली तरी आपल्याला ते त्या तालावर नाचत आहेत असं
वाटेल....प्रत्यक्षात हे मिथ्या आहे.
Gods must be crazy नावाचा एक धमाल पिक्चर बघितला होता,दुसरा
भाग ज्यात वेगवेग्ळ्या गोष्टी एकाच वेळी अफ़्रिकेच्या कलहारी वाळवंटात घडत आहेत...आणि शेवटी नियती त्यांना एकत्र आणते
आणि त्या दरम्यान आणि त्यानंतर ची धमाल म्हणजे हा चित्रपट.
त्या प्र्संग मालिके मधे एका आफ़्रिकन आदिवासी माणसाची दोन
छोटी मुलं हरवली आहेत,ही मुलं पहिल्यांदाच बघितल्या ट्रक मधे कुतुहलाने चढतात आणि
मग ट्रक सुरु होउन त्या बरोबर त्यांची सफ़र सुद्धा सुरु होते!
ट्रक मधुन बाहेर पडल्यावर वन्य प्राण्यांच्या प्रदेशात ही
पोरं येतात आणि एक तरस त्या दोघांवर चालुन
येतं,ते तसं येताना बघितल्यावर ती पोरं कुठुन तरी लाकडाची फ़ळकुटं मिळवतात, आणि
ती डोक्यावर उभी धरतात....ते बघुन ते तरस घाबरुन पळुन जातं....कारण स्वत: पेक्षा
आकाराने काहीतरी मोठा प्राणी आहे असं त्याला
वाटलं...
बिबट्याच्या हल्ल्यांमधे सुद्धा समजा तुम्ही तुमचे दोन हात
वर करुन स्वत: ला त्याच्यापेक्षा मोठ्ं दाखवण्याचा दिखावा केलात की बिबटे घाबरुन
पळुन जातात.
निसर्गात अशा अन्य देखील गोष्टी दिसतात ज्या स्वत:च्या
संरक्षणासाठी वेगळं रुप घेतात किंवा आपण द्रुष्टीला पडु नये म्हणून आजुबाजुच्या
वातावरणात मिसळुन जातात.
पफ़र फ़िश नावाचा मासा जो संकट जाणवलं की स्वत:ला फ़ुगवतो...
माणुस मात्र जसजसा प्रगल्भ होत गेला तसा स्वसंरक्षणाबरोबरच
स्वस्तुती आणि स्वप्रतिमा निर्मिती बद्दल जास्त जागरुक झालेला दिसतो,आजकाल जरा
जास्तच....
मी किती मोठी/मोठा महान इतका द्न्यानी इतका विद्वान हे
दाखवण्यासाठी काही लोक स्वत:ला फ़ुगवतात,डोक्यावर फ़ळकुट घेउन उंच झाल्याचा देखावा
करतात.सर्व शक्तीमान असल्याचं नाटक करतात, पण खरी गोष्ट अशी की एकटे पडतात तेव्हा
त्यांनाच कळत असावं आपण किती पोकळ आहोत....
ध्रुव भट हे गुजराती लेखक एका मुलाखती मधे एक गोष्ट
सांगताना म्हणतात,कुत्र्यांचा कळप एका नव्या कुत्र्याला बघुन म्हणतात,
"आमच्या इलाक्यात येउ नकोस!" नवा कुत्रा विचारतो, "इलाका म्हणजे काय?"
तेव्हा कळपाचा नेता तो कुत्रा म्हणतो, "तु इथे ये म्हणजे सांगतो इलाका म्हणजे
काय ते!" नवीन कुत्रा म्हणतो मला समजलं तुझा इलाका म्हणजे काय! तो तुझा इलाका
नसेल तर तु काहिच नाहीस.....तसं काहिसं ह्या व्यक्तींच होत असावं नाही?
ज्या व्यक्ती खरोखरच महान आणि त्या उंचीच्या असतात, त्यांना कधी स्वत:च्या बद्दल
बोलण्याची गरज पडत नाही.
समुद्र किंवा पर्वत कधी स्वत:चा दिखावा करायला जात नाहित
त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठी अशा दिखाव्यांची गरज नसते पर्वतांनी थोडी
हालचाल केली तर काय अनर्थ होतो किंवा
समुद्र उधाणला की काय होतं हे वेगळं सांगायची काय गरज?
तस्मात.... उत्तुंग व्हायचंच
असेल तर हिमालयासारखं शांत आणि संयमीत असणं, विशाल व्हायचं असेल तर,समुद्रासारखं अथांग खोल आणि अफ़ाट व्हायचं असेल तर आकाशाप्रमाणे निरंतर आणि अदभुत असणं आवश्यक असतं.
मधुवंती गोडसे



No comments:
Post a Comment