लहानपणीचे दिवस आणि विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात केलेल्या उनाडक्या आठवल्या
की हमखास आठवतो शेजारील मुला मुलींचा कंपु... वेगवेगळे गेम्स खेळणे,पुस्तकं वाचणे आणि गच्चीवर झोपणे याशिवाय जवळच्या टेकडीवर
निदान एक तरी ट्रिप ठरलेली असायची,रेल्वे ट्रैक ओलांडुन
पलीकडे जाउन अर्ध्या तासात टेकडी चढुन जायची आणि वरुन दिसणारं गाव बघुन चटक मटक
खाउ खाउन परत निघायचं, परत रेल्वे ट्रैक ओलांडुन अलिकडे
आल्यावर तिथल्या वडाच्या झाडावर हात लालेलाल होई पर्यंत आणि अंधार पडेपर्यंत सुरपारंब्या खेळायच्या आणि
रात्री गच्चीवर झोपायचं... ही सगळी मस्ती कायमच आमच्या सगळ्या ग्रुप ने एकत्र
करायची,गच्चीवर झोपताना सुद्धा भुताच्या गोष्टी सांगता ऐकता
झोपुन जायचं.
अशातच एक अजुन मुलगा आमच्या त्या गैंग मधे सामील झाला, मुंबईला राहणारा आणि उन्हाळ्यातच फ़क्त इथे येणारा
उनाडक्या करायला पुस्तकं वाचायला सगळीकडे तो बरोबर असायचा, टेकडीवर यायला त्याला परवानगी नव्हती मग
त्याच्या आई बाबांना जाउन भेटुन त्यांची परमिशन मिळवणं गच्चीवर झोपण्यासाठी अनुमती
मिळवणं हे सगळं आम्ही केलं, गच्चीवर झोपायला
आलेल्या ’त्या’ ला रात्री मधेच त्याचे आई बाबा घ्यायला आल्याचं आठवतात....नंतर
कळलं त्याचं कारण होतं त्याला येणार्या फ़ीट्स...
टेकडीची परवानगी
जेमतेमच मिळाली असावी सगळे टेकडीवर पोहोचलो, त्यावेळी पायात चढण्यायोग्य बुट घालावेत अशी अक्कल नव्हती आणि कोणी
सांगायचंही नाही त्यामुळे अगदी साध्या चपला किंवा साधे कापडी बुट घालुन जायचो....असेच
एकदा वर पोहोचलो बरोबर बांधुन आणलेली भेळ खाउन गावचा नजारा वरुन बघुन झाला,एखादी लोकल दिसली,बाजुने वाहणार्या शांत क्लांत
इंद्रायणी नदीला बघुन परत उतरायला लागलो, जसे चढलो तसेच
उतरायचं ठरलं आणि उभी उतरण आणि तकलादु बुट यामुळे पाय घसरायला लागले त्यामुळे ‘ती’ची
भंबेरीच उडाली होती,तेवढ्यात तो आलाच तिथे खरंतर तो
तिच्यापेक्षा छोटा पण जास्त समंजस....
ती अशी घाबरलेली आणि उतरण्याचा मार्ग शोधताना बघुन तो तिला म्हणाला ," चल
आपण धावत उतरुया! " ती विचारातच पडली जिथे उतरायला पाय टाकायला धजावेना तिथे
धावत?" तिच्या मनाची अवस्था त्याने ओळखली असावी!
तो म्हणाला, " दोस्त!तुझा विश्वास आहे न माझ्यावर?" तीने क्षणभर
त्याच्या कडे पाहिलं... आणि...आणि पुढच्या क्षणी हातात
हात घेउन दोघंही टेकडीवरुन पळत खाली आले होते!
प्रत्येक ती आणि तो चं नातं फ़क्त त्या एकाच चौकटीतलं नसतं.
मधुवंती
No comments:
Post a Comment