खरं तर बऱ्याच दिवसांनी गच्चीवर गेले होते. गच्चीवर लावलेल्या झाडांना भेटायला! बघते तर शेवंती, गुलाब छान हसत होते; पण मोगरा मात्र पार सुकून गेला होता. त्याच्याकडं बघून खूप वाईट वाटलं आणि स्वत:चाच राग आला. मनाशी म्हटलं, ‘माझंच दुर्लक्ष झालं. रोज नियमित यायला हवं होतं... गेला आता, सुकला माझा मोगरा!!’
त्यानंतर नित्यनेमाने झाडांना पाणी घालण्याचा क्रम सुरू ठेवला. परवा बघितलं तर काय! मोगऱ्याच्या त्या सुकलेल्या कुंडीतुन एक हिरवागार कोंब डोकावत होता. मोगरा जिवंत होता. त्याने परत अंग धरलं.
आपलं आयुष्य पण असंच असावं, नाही का? जरी खत पाणी मिळालं नाही काही दिवस, सूर्यप्रकाश दिसला नाही कित्येक दिवस, तरी तग धरून राहायला हवं. फक्त या आशेवर की पुन्हा दिवस उजाडेल... पुन्हा ऊन पडेल आणि आपल्या आयुष्याला उमेदीचे नवीन धुमारे फुटतील... माणूस कशावर जगत असतो? हवा, पाणी, अन्न....नातेवाइक की मित्रमंडळ? मला वाटतं माणूस फक्त आशेवर जगत असतो... चांगलं घडण्याची आशा,नवीन व्यक्तींची आशा,आणि अशी बरीच कारणं...हाडं गोठवणारी थंडी असते. वर-खाली सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला असतो. तरीही गिर्यारोहक मात्र एक एक पाऊल टाकत असतो. कदाचित त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षासुद्धा त्याच्या मनातली आशा त्याला शिखरावर पोहोचण्यास मदत करते. आशेवर अनेक संसार चालतात आणि अनेक व्यवसायही... आशावादामुळे जाहिरातींचा बाजार वाढतो आणि जाहिरातींमुळे आशा... आता हा जाहिरातींचा बाजार चांगला की वाईट हे ज्याचं त्याने ठरवायचं... एवढंच काय, तर बऱ्याच भोंदूबाबांचे आध्यात्मिक व्यवसायही माणसांच्या आशा-आकांक्षांशी खेळ करत चालतात. hopes वर माणूस आख्खं आयुष्य कोणाची तरी वाट बघू शकतो. खडतर कष्टप्रद जीवन जगू शकतो आणि धीर धरू शकतो... आशावादी असायलासुद्धा खुप बळ असावं लागतं; कारण निराशावादी लोक नकारात्मक विचार करतात, self destroying... आत्मघाती बनतात किंवा स्वरस नसलेल्या बांडगुळासारखे जगत राहतात. कधी कुठल्या व्यसनात स्वत:ला गुरफटून घेतात आणि आयुष्याची माती करून घेतात... आशा, स्वप्नं ही कधी दुसऱ्यांच्या हिशेबात कितीही अवास्तव असली... तरीही आपल्यासाठी ती सर्व काही असतात. ती उराशी बाळगून जगलं पाहिजे. फुलांबरोबर काट्यांचीही तयारी ठेवली पाहिजे... समस्या असतात, ताण-तणाव असतात; पण त्यांचा तोडगाही असतोच, तोही आपला आपल्याकडे... त्यामुळे आशावादी राहा मित्र आणि मैत्रिणींनो... कारण आयुष्य खुप सुंदर आहे... अगदी मोगऱ्याच्या फुलासारखं!!
No comments:
Post a Comment